

पणजी ः केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्राची मागणी मान्य करत मराठीला अभिजात दर्जा दिला, ही आनंददायी बाब आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी केले.
बांबोळी येथील गोवा विद्यापीठात राजारामबापू ललित अकादमी महाराष्ट्रतर्फे गोवा विद्यापीठाच्या साहित्य महाशाळा व मराठी अध्यासनतर्फे आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. यावेळी लेखक डॉ. सदानंद मोरे, कुलगुरू डॉ. हरीलाल मेनन, महाशाळा डीन डॉ. अनुराधा वागळे, मराठी अध्यासन संचालक डॉ. विनय बापट, प्रतीक पाटील, डॉ. रमेश वरखेडे, प्रदीप पाटील, आर. सावंत, देवराज पाटील उपस्थित होते.
गोवा हे हमरस्त्याकडेचा कचरा उचलणारे व कचर्यापासून वीज निर्मिती करणारे एकमेव राज्य असावे, ही बाब कौतुकास्पद आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. गोवा आता बदलला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारकीर्दीत अनेक विकास प्रकल्प गोव्यात उभे राहिलेत. नवे रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांत गोवा बराच पुढे गेला आहे, असेही त्यांनी सांगितले. या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते डॉ. रमेश वरखेडे यांना राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललितकला जीवनगौैरव सन्मान, अभिराम भडकमकर, डॉ. मीनाक्षी पाटील व डॉ. तुकाराम रोंगटे यांना राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललितकला सन्मान तसेच प्रकाश जडे व प्रा. अनिल सामंत यांना राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललितकला विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले.
डॉ. सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यातील पोर्तुगीजांच्या अत्याचारावर अंकुश लावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर बांधले. त्यांच्यामुळेच गोव्याची संस्कृती टिकली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला मुक्त करण्यासाठी दिलेले योगदान, महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांचा मुक्तीलढ्यातील सहभाग आणि गोवामुक्तीनंतर गोव्यात मराठी भाषा शिकवण्यासाठी आलेले शिक्षक, यामुळे गोवा व महाराष्ट्र यांच्यातील नाते अधिक दृढ झालेले आहे. हे नाते असेच वृद्धिंगत व्हावे यासाठी आपले सरकार प्रयत्न करील, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.