

फोंडा : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मी नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत राहिलो पण माझ्यावरील अन्याय दूर करण्याची वेळ आली, तेव्हा माझे मित्र असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे माझ्यावरील अन्यायाविरुद्ध भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट मत प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले. खांडोळा-माशेल येथील बीग बी सभागृहात कार्यकर्त्यांसमोर बोलताना गोविंद गावडे यांनी आपल्या भावना व्यक्त करून मन हलके केले. प्रियोळ प्रगती मंचने ही सभा बोलावली होती.
रविवारी झालेल्या या सभेला पाच हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. यात जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोविंद गावडे म्हणाले, आपण आतापर्यंत सात खात्यांचा पदभार सांभाळला पण कुठेही अन्याय होऊ दिला नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिलेला शब्द पाळला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पक्षाचे कार्य केले. पण या कामाची पावती मला क्रांतिदिनाच्या दिवशी माझ्याकडून मंत्रिपद काढून घेऊन दिली. मला मंत्रिपदाची हौस नाही. मागे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले तेव्हा मी मंत्रिपदाचा त्याग करायला तयार असून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणार्या आमदारालाच हे मंत्रिपद द्या, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते त्याची आठवण गोविंद गावडे यांनी करून दिली. मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला बोलावणे पाठवले तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी मी स्वतः माझे मित्र डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा आग्रह धरला.
ज्यावेळेला जी 6 गट झाला त्यावेळेला प्रमोद सावंत यांनाच पाठिंबा दिला पण मला जेव्हा केंद्रीय नेतृत्वाकडे बोलण्याची संधी मी मुख्यमंत्र्यांकडे मागितली त्यावेळेला मला ही संधी मुख्यमंत्र्यांनी नाकारली. असे सांगून काही पत्रकारांच्या शब्दांच्या खेळाला मुख्यमंत्री बळी पडले पण माझे म्हणणे केंद्रीय नेतत्वाकडे मांडू दिले नाही. मी प्रेरणादिन कार्यक्रमात कुठेही मुखमंत्र्यांवर आरोप केले नाहीत. फक्त आदिवासी कल्याण खात्यावर आसूड ओढले ही माझी चूक झाली का, आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जे बोललो ते चूक आहे का असे विचारून गोविंद गावडे यांनी सुरुवातीचे आंदोलन, आमदारकीचा काळ ते मंत्रिपद असा आढावा घेत आपले म्हणणे मांडले, मीडियाने आपल्याला हव्या तशा बातम्या दिल्या आणि त्या ग्राह्य धरून माझे मंत्रिपद काढून घेण्यात आले, असे गोविंद गावडे म्हणाले.
गावडे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताला पाठिंबा असून भाजपशी द्रोह करणार नाही, पण केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागणार आहे. त्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आणि राष्ट्रपतींना पुराव्यांसह पत्र पाठवणार आहे. आपल्याबद्दल मुद्दामहून उठवण्यात आलेल्या अफवा आणि संभ्रमित झालेला कार्यकर्ता आणि मतदार यांना सत्य काय ते कळावे यासाठीच ही सभा बोलावण्यात आली, असे गोविंद गावडे म्हणाले. माझे कार्यकर्ते आणि माझे मतदार हीच माझी शक्ती असल्याचे सांगून तुडुंब भरलेल्या सभागृहासमोर गोविंद गावडे यांनी शेवटी साष्टांग नमस्कार घातला.