आमदार अपात्रताप्रकरणी 4 नोव्हेंबरपर्यंत निवाडा शक्य

3 ऑक्टोबरपासून सुनावणीस सुरुवात; सभापतींची माहिती
MLA disqualification case
रमेश तवडकरPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर जलदगतीने सुनावणी घेण्याची तयारी सभापती रमेश तवडकर यांनी सुरू केली आहे. त्यामुळे यावर 4 नोव्हेंबरपर्यंत निवाडा होण्याची शक्यता आहे. या सुनावणीला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार असून तशी नोटीस लवकरच बजावली जाणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने सभापती तवडकर यांची बाजू ऐकून घेताना सुनावणी पूर्ण करण्यासाठी आणखी किती मुदत लागेल, याची विचारणा केली होती. त्यानुसार ही सुनावणी 4 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. त्यानंतर याचिकादार आणि प्रतिवाद्यांना युक्तिवादासाठी एक दिवस दिला जाऊ शकतो, असेही वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. आठ आमदारांपैकी सातजणांनी आपले लेखी उत्तर सादर केले आहे. फक्त एका आमदाराचे उत्तर येणे बाकी असून त्यासाठी नव्याने नोटीस बजावताना शेवटची संधी दिली जाईल. उत्तर-प्रत्युत्तर सादर झाल्यानंतर युक्तिवादही लेखी सादर करण्याची सूचना केली जाणार आहे. वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निवाडा राखीव ठेवून 4 नोव्हेंबरपर्यंत निवाडा वाचन होणार असल्याचे सभापतींच्या वकिलांनी न्यायालयाकडे स्पष्ट केले आहे.

सदर याचिका ठरावीक मुदतीत निकालात काढण्याचा आदेश सभापतींना द्यावा, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सदर सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावर सभापतींना आदेश देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नसल्याचा दावा सभापती तवडकर यांच्या वकिलांनी केला होता. सभापतींना कालबद्ध मुदतीत अपात्रता याचिका निकालात काढण्याचा आदेश न्यायालय देऊ शकत नाही. तसा आदेश दिल्यास तो विधीमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप होईल, असे सभापतींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

कालमर्यादेसाठी याचिका

महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने वेळेच्या बंधनात याचिका निकालात काढण्याचा आदेश दिला होता. त्याच धर्तीवर गोवा विधानसभेचे सभापती तवडकर यांनाही 8 आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका ठरावीक मुदतीत निकालात काढण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी चोडणकर यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news