

पणजी/म्हापसा : महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचा पुत्र फरहान याने गोव्यात धुडगूस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडिकेटर न दाखवता कारने वळण घेतल्यामुळे कांदोळी-कळंगुट येथे मोठा वाद झाला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी फरहान आझमीसह, झिऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, श्याम यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. फरहान आझमी हा अभिनेत्री आयेशा टाकिया यांचे पती आहेत. दरम्यान, आझमी यांना स्थानिकांनी मारहाण केल्याचा दावाही करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आझमी आपल्या कारने कांदोळी भागातून जात असताना त्याच्या कारने न्यूटन सुपर मार्केट येथे इंडिकेटर न दाखवता वळण घेतले. त्यावरुन मोठा वाद झाला. स्थानिकांनी आझमी याच्या कारभोवती एकत्र येत मोठा गोंधळ घातला. त्यावेळी आझमी याने बंदुकीचा धाक दाखवला, असा दावा स्थानिकांनी केला.
ही घटना सोमवारी 3 मार्च रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. यावेळी प्रकरण हातघाईवर येण्याआधीच एकाने पणजीतील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुरुवातीला स्थानिकांनी फरहान आझमी याला पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध केला. परंतु, कळंगुट पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक परेश सिनारी व इतरांनी फरहान व त्याच्यासोबत असलेल्या तरुणांना कळंगुट पोलिस स्थानकात आणले. मात्र,दोन्ही गटांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. त्यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, त्यांनी वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी राज्य सरकारच्या वतीने तक्रार दाखल केली. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 195 तसेच 35 कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच कलम 35 अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
फरहान आझमी याने स्थानिकांना बंदुकीचा धाक दाखविल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडील बंदूक ताब्यात घेतली. आझमी याने संबंधित अधिकार्यांनी जारी केलेला वैध शस्त्र परवाना आणि गोव्यात बंदूक बाळगण्याचा परवाना पोलिसांना सादर केला.
कालची रात्र ही आमच्या कुटुंबासाठी भयानक रात्र ठरली. गोव्यात स्थानिक गुंडांनी माझ्या कुटुंबियांना त्रास देत धमक्या दिल्या. माझ्या पतीसह मुलालाही वाईट वागणूक देण्यात आली. पती व मुलाला मारहाण करण्यात आली असून फरहान आणि माझ्या मुलाला संबंधितांनी शिव्या देत धक्काबुक्की केली, असा दावा फरहान आझमीची पत्नी आणि अभिनेत्री आयशा टाकीया हिने सोशल मीडियावर केला आहे.