राज्यात मोफत पाणी योजनेचा गैरवापर : मुख्यमंत्री डॉ. सावंत

एकेका घरात चार जोडण्या
misuse-of-free-water-scheme-in-state-chief-minister-dr-sawant
आगशी : ‘हर घर नल से जल’ अंतर्गत पाणी प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला आमदार विरेश बोरकर.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : राज्य सरकारची लोकप्रिय ‘मोफत पाणी’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याने ती योजना बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. एका घरात चार-चार जोडण्या घेतल्याचे प्रकार आढळून आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

आगशी येथे उभारलेल्या आगशी नावशी पाणी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार विरेश बोरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, योजनेचा उद्देश घरगुती ग्राहकांना दिलासा देण्याचा असतानाही अनेक नागरिकांनी नियमांची पायमल्ली करत एकाच घरासाठी वेगवेगळ्या नावाने अनेक पाणी जोडण्या घेतल्याचे उघडकीस आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही जणांनी एकाच घरात तीन ते चार वेगळ्या जोडण्या घेतल्या. त्यामुळे सरकारला ती योजना पुढे चालू ठेवणे कठीण झाले.

सध्या गोवा सरकार प्रत्येक ग्राहकासाठी पाणीपुरवठ्यावर प्रति घनमीटर 20 इतका खर्च करत आहे, तर ग्राहक केवळ 3 ते 4 प्रति घनमीटर दराने पाणी वापरत आहेत. त्यामुळे सरकारवर आर्थिक ताण निर्माण होत आहे, हा ताण 20 टक्क्यांवर आणण्यासाठी ही योजना बंद केल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, योजना सुरू करताना आम्ही निःस्वार्थ भावनेने नागरिकांना मदत करावी, यासाठी ती सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, काहींनी त्याचा गैरवापर केला. त्यामुळे सरकारला ही योजना मागे घ्यावी लागली.

‘हर घर फायबर’ राबविणार

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी ‘हर घर फायबर’ हा आमचा पुढील महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने गोव्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. डिजिटल भारताच्या दिशेने गोवा झपाट्याने वाटचाल करत असून, ‘हर घर फायबर’द्वारे राज्यातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

या योजनेतून गावांतील, दुर्गम भागांतील नागरिकांनाही जलद इंटरनेट सेवा मिळेल, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि शासनसेवा यामध्ये सुलभता निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नवीन धोरण लवकरच

सरकार सध्या पाणीपुरवठा धोरणाचा फेरआढावा घेत असून, पुढील काळात नवे दर आणि नियम तयार करून सुधारित योजना आणण्याचा विचार आहे. पाणी वाचवणे, त्याचा योग्य वापर करणे आणि गरजूंना न्याय देणे, हेच आमचे उद्दिष्ट राहील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news