नोकर्‍या घ्या, नोकर्‍या..!

मंत्री विश्वजित राणेंच्या बंडाचा आवाज दिल्लीपर्यंत
Minister Vishwajit Rane's rebellion reached Delhi
विश्वजित राणे Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मंत्रिमंडळातील नंबर दोनचे मंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या मतदारसंघात भाजपच्या सदस्य मोहिमेदरम्यान, ‘जर हे सरकार नोकर्‍या देणार नसेल, तर ते काय कामाचे’, असा पवित्रा घेतल्याने त्याची गुंज दिल्लीपर्यंत पोहोचली. प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मध्यस्थाची भूमिका घेत राणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

दरम्यान, सरकारी नोकर्‍यांसाठी अनेक तरुण सरकारकडे अपेक्षेने पाहत आहेत, असे मत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मांडल्याने, हा विषय आणखी गंभीर बनला आहे. त्यातच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दोना पावला येथे राज्यात येत्या अडीच वर्षांत 2 लाख नोकर्‍या निर्माण होतील, असे जाहीर केल्याने सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशाबरोबर राज्यात सध्या भाजप सदस्य मोहीम सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. बुधवारी 25 रोजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई येथे मेळावा घेत सरकारवरच तोफ डागली. ‘जर सरकार सरकारी नोकर्‍या देत नसेल, तर ते काय कामाचे, असे सरकार बदला असा सल्ला मी आपल्याला देईन’, असा पवित्रा घेतल्याने राज्यात खळबळ माजली. त्यासोबतच विविध स्तरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाच मुद्दा पकडत राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 4.5 टक्के असताना राज्यातील बेरोजगारीचा दर हा 8.5 टक्क्यांच्या वर गेल्याचे सांगत सरकारवर जोरदार टीका केली. राणे यांचा बेरोजगारीचा मुद्दा पकडत गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्यातील बेरोजगारांना सरकारी नोकरीची गरज असून त्या मिळायला पाहिजेत, अशीच ’री’ ओढल्याने नोकर्‍यांच्या प्रश्नावर पेटलेल्या भडक्यात तेल ओतले आहे. सध्या राज्यात सरकारच्या विरोधात विरोधकांनी उठवलेले रान पाहता त्यांना नोकर्‍यांचा आयता मुद्दा हाती मिळाल्याने तेही आता आक्रमक झाले आहेत.

नोकर्‍यांप्रश्नी मंत्री आणि सत्ताधारी आमदारच जाहीरपणे सरकारविरोधात बोलू लागल्याने हे प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचले आहे. पक्षश्रेष्ठींनी ही बाब प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घालत मंत्री राणे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी राणे यांच्याशी चर्चा करत त्यांची भूमिका समजावून घेतली.

अडीच वर्षांत दोन लाख नोकर्‍या : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी 26 रोजी दोना पावला येथील कार्यक्रमात राज्यात विविध खात्यांत योग्य तर्‍हेने नियोजन केल्यास 2 लाखांवर नोकर्‍या मिळतील, अशी स्थिती असल्याचे सांगितले. प्रत्येकाने केवळ सरकारी नोकरीवर लक्ष न ठेवता खासगी नोकर्‍यांमध्येही आपले कौशल्य दाखवून नोकर्‍या मिळवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news