

पणजी : पर्वरी येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. कंत्राटदाराच्या मते हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी काही ठराविक दिवशी रस्ता बंद करूनच काम करावे लागेल. मात्र हे काम करताना वाहतुकीला अडथळा नको, अशी सूचना आपण केली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. मंत्री खंवटे म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याशी आपण चर्चा केली आहे. उड्डाणपुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी योग्य ते नियोजन करावे. खराब रस्त्यांवर हॉटमिक्सिंग डांबरीकरण करावे. वाहनांसाठी पार्किंग जागा उपलब्ध करावी. जेथे धुरळा उडतो तेथे डांबर घालावेत, अशा सूचना आपण कंत्राटदाराला केल्या असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, योग्य नियोजन करून काम केले तर लोकांना त्रास होणार नाही. सध्या पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यांना त्रास झाला तर गोव्याची बदनामी होऊ शकते. त्यामुळे नवे रस्ते तयार करावेत, अशी सूचनाही आपण केल्याचे खंवटे म्हणाले.