

पणजी : आम्ही भाजपमध्ये कोणत्याही अटी किंवा अपेक्षा न ठेवता सामील झालो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य केला. ज्यांना मंत्रिपदे मिळायची होती, त्यांना ती मिळालीसुद्धा. मात्र, अनेक सामान्य जनतेच्या अपेक्षा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशी स्पष्ट टिपणी भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार लोबो यांनी राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर सूचक स्वरात नाराजी व्यक्त केली.
आमदार लोबो म्हणाले, काही मंत्री उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, हे मान्य आहे; पण काही मंत्री जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात जर फेरबदल होत नसेल, तर किमान खात्यांचे पुनर्वाटप करणे आवश्यक आहे, जेणेकरून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले.
आमदार लोबो यांनी सांगितले की, आम्ही सत्तेसोबत आहोत, पण जनतेच्या सेवेसाठी. जर कार्यक्षम मंत्रीच चुकीच्या खात्यांमध्ये अडकून राहिले आणि निकृष्ट काम करणारे मंत्री महत्त्वाच्या खात्यांवर राहिले, तर त्याचा फटका थेट जनतेला बसतो. त्यामुळे हा विषय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावा. गोवा विधानसभेतील राजकीय घडामोडींत अनेकदा चर्चेत राहिलेल्या लोबो यांनी 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची भूमिका मुख्यतः पक्षासाठी सकारात्मक राहिली आहे. मात्र, सध्याच्या वक्तव्यातून त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट इशारा दिला आहे की, कार्यक्षमतेच्या आधारावर फेरघडामोडी झाल्या पाहिजेत.