

पणजी ः राज्य सरकारने म्हजे घर योजना सुरू केली असून कोमुनिदाद जमिनीतील, 20 कलमी तसेच सरकारी जमिनीतील असलेली बेकायदा घरांना कायदेशीर मंजुरी देण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या मंजुरीनंतर सुमारे 50 टक्के गोमंतकियांना लाभ होणार आहे. लवकरच या योजनेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाल्यानंतर फॉर्म वितरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मध्यप्रदेश येथूून ज्या घोषणा जाहीर केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी गोव्यामध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कला अकादमीच्या कृष्ण कक्षात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
ते म्हणाले, राज्यातील 20 कलमी योजनेेंतर्गत वितरित केलेल्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या घरांना मालकी हक्क देण्याबाबतचे परिपत्रक महसूल खात्याने जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामुळे राज्यातील सुमारे 6 हजार गोमंतकीय कुटुंबांना लाभ मिळणार आहे. ते म्हणाले, सरकारने अधिसूचित केलेल्या भूखंडाच्या एक विसावा भाग इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. मालकी हक्क मिळाल्यावर अनधिकृत बांधकाम नियमन कायद्यानुसार स्वतंत्र अर्ज करून ती घरे अधिकृत करावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने उपजिल्हाधिकार्यांना अधिकार दिले असून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ते म्हणाले, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व सरकारी इस्पितळे, सामाजिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय महापोषण अभियानांतर्गत मुलांचे संगोपन चांगले व्हावे, यासाठी या योजनेची अंमलबजावणीही राज्यातही केली जाणार आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर 5 हजार रुपये, दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर 6 हजार रुपये मातेच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. ते म्हणाले, सुमन शक्ती चार्ट बोर्ड अंतर्गत महिलांना ‘ए आय’च्या माध्यमातून आपले आरोग्य जाणून घेण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. आदी कर्मयोगी, आदी सेवा पर्व, आदी सखी आणि आदी साथी या आदिवासींच्या कल्याणासाठीच्या योजनांची कार्यवाहीही राज्यात केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत गोव्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांना 62 कोटीचे कर्ज वितरित केले आहे. तसेच क्लस्टर फेडरेशन तर्फे 25 वाहने विविध स्वयंसहाय्य गटांना व्यवसायासाठी वितरित करण्यात आली आहेत. गेल्या अकरा वर्षांमध्ये देशासोबत गोव्याचा भरीव विकास झालेला आहे, अनेक नवे प्रकल्प गोव्यात झाले असून, शैक्षणिक आणि इतर संस्था स्थापन झाल्या आहेत. जगात भारत चौथी आर्थिक सत्ता बनली आहे. देश सुरक्षित झाला असून घुसून मारणारे सैन्य देशात तयार झाले आहे. याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना द्यावे लागेल. यावेळी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. सावंत व कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विश्वकर्मा यांच्या तसबिरीली हार अर्पण केला.