

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) पेडणे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना पुन्हा कोणत्याही परिस्थितीत पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करत, पक्षाची संघटना अधिक बळकट करून आगामी विधानसभा निवडणुकीत पेडणे मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. पेडणे सभागृहात आयोजित मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
सभागृह खचाखच भरल्याने अनेक कार्यकर्त्यांना बाहेर उभे राहून कार्यक्रम ऐकावा लागला. दीपक ढवळीकर म्हणाले, "मगो पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच मगो आजही सक्षमपणे उभा आहे. पेडणेकरांनी यापुढेही मगोला साथ दिल्यास राजन कोरगावकर निश्चितच विधानसभेत पोहोचतील. वेळप्रसंगी आपणही विधानसभेत असू." पेडणे मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत राजन कोरगावकर हेच पेडण्याचे आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.
तसेच पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली ४० सदस्यीय कार्यकर्त्यांची समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच याही वेळी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी सरपंच शशिकांत महाले यांनी मागील निवडणुकीत अल्पमताने पराभव होऊनही राजन कोरगावकर यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवत रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेशी संपर्क कायम ठेवल्याचे सांगितले.
पेडण्याचा स्वाभिमानी भूमिपुत्र म्हणून त्यांनाच विधानसमेत पाठविण्याचा निर्धार पेडणेकर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिद्धी किनळेकर यांनी मगो पक्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. भाऊसाहेब बांदोडकर यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे भाग्य आपल्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीला लाभल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
माजी सरपंच सुदीप कोरगावकर, राजू नरसे, रुपेश परब, माजी सरपंच शशिकांत महाले, गजानन गडेकर, केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी राघोबा गावडे, मधू पालयेकर, सिद्धी किनळेकर, प्रताप भेंडाळकर तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा पालयेकर यांनी केले, तर प्रास्ताविक राजू नरसे यांनी केले. राजन कोरगावकर यांच्या हस्ते दीपक ढवळीकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पक्षाचे अस्तित्व जपणारे खरे भूमिपुत्र : कोरगावकर
राजन कोरगावकर यांनी कार्यकर्त्यांनी अल्पावधीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षावरील प्रेम व्यक्त केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनतेने दाखवलेला विश्वास कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पेडणेकर आपल्याला आमदार म्हणून संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना टीका करणाऱ्यांना टीका करू द्या; पक्षाचे अस्तित्व जपणारेच खरे भूमिपुत्र असतात, असेही ते म्हणाले.