मडगाव : सुळकर्णेच्या डोंगरावरून माती मिश्रित चिखलाचा ओघ; कुटुंबांचे स्‍थलांतर

सुळकर्णे डोंगर
सुळकर्णे डोंगर

मडगाव; पुढारी वृत्तसेवा सुळकर्णेच्या डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर डोंगरावरील माती मिश्रीत चिखलाचा ओघ गावात वाहून येतो. हा प्रकार अजून थांबलेला नाही. त्यामुळे संपूर्ण सुलकर्णा गाव धोक्याच्या उंबरठ्यावर आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चार घरातील कुटूंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी तातडीने गावाला भेट देऊन पहाणी केली असून, जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सक्रिय होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
विधानसभा अधिवेशन संपवून फळदेसाई यांनी ताबडतोब सुळकर्णा गावाला भेट दिली. कोणत्याही क्षणी गंभीर घटना घडू शकते, पण अजून खाण खात्याने त्याची दखल घेतलेली नाही. खाण खात्याला बाहेरुन भूगर्भशास्त्रज्ञ आणून तपासणी करावी लागणार काय अशा शब्दात मंत्री फळदेसाई यांनी खाण खात्याला फटकारले आहे.

फळदेसाई यांनी गुरुवारी अधिवेशन संपताच सुलकर्णा येथे भेट देऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर खाण खात्याला जाग येणार आहे का? अशी टीका फळदेसाई यांनी केली आहे. मंगळवारपासून डोंगरावरून गावात माती वाहून येत आहे. दोन दिवस उलटुन सुद्धा हा प्रकार थांबलेला नाही. अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांना घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. आपण गावांतील लोक आणि अग्निशामक दलाच्या जवानांबरोबर डोंगराची पाहणी केली आहे. डोंगरावर एक खाण पिट असुन, त्यातील खनिज मिश्रित चिखल गावात वाहून येत आहे. पाऊस बंद झाल्यानंतर तो चिखल वाहणे बंद होणे आवश्यक होते, पण डोंगरातील झरीच्या पाण्यासोबत भरपूर माती खाली येत आहे. हा प्रकार अतिशय धोकादायक असल्याचे दामोदर यांनी मंत्री फळदेसाई यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

फळदेसाई यांनी खाण खाते आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. खाण खात्याकडे भूगर्भशास्त्रज्ञ असतांना त्यांनी या घटनेची दखल घेतली नाही. एवढा उशिर होण्यामागे खाण खाते दिल्लीवरून भूगर्भशास्त्रज्ञ आणू पहात आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घटनेचे गांभीर्य पाहून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने ताबडतोब हालचाली सुरू करणे आवश्यक होते. कित्येक वेळा फोन केल्यानंतर केपेचे मामलेदार सुळकर्नेत येऊन गेले. ते चित्रपट पहायला आले होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही क्षणी डोंगर कोसळू शकतो. त्या अनुषंगाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे आवश्यक होते. पण आपत्कालीन व्यवस्थापण यंत्रणेला त्याचे काही देणेघेणे नसल्याने सिद्ध होत आहे अशी टीका फळदेसाई यांनी केली.

दरम्‍यान दर दोन तासांनी एक टँकर भरेल एवढा चिखल गावात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना फळदेसाई यांनी दिल्या आहेत. पोलिस पथक घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले आहे. डोंगराच्या पोटातून माती बाहेर पडत आहे. हा चिखल लोकांचा शेतात आणि ओहोळात जमू लागला आहे. वेळीच संशोधन न झाल्यास संपूर्ण डोंगर आतून पोखळ होऊन वीस घरांवर कोसळू शकतो अशी भीती फळदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news