

पणजी : मागील 5 वर्षांत 50 मराठी शाळा बंद पडल्या आहेत, तर येत्या काळात तब्बल 200 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्याचे सरकार सत्तेत आल्यानंतर मराठीचे पंख कापले गेले आहेत, असा आरोप प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी रविवारी पणजीतील मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात केला.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक गो. रा. ढवळीकर, माजी महापौर अशोक नाईक, शानुदास सावंत, अनिल खंवटे, रामदास सावईवेरेकर, मिलिंद कारखानीस, नेहा उपाध्ये, अश्विनी अभ्यंकर, शरदचंद्र रेडकर, वेद आमोणकर उपस्थित होते. यावेळी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रतिज्ञा केली.
प्राचार्य वेलिंगकर म्हणाले, केवळ मतांसाठी मराठी शाळांचा केलेला बोलबाला आता कुठे गेला? सावंत सरकारने मागील वर्षात मराठी शाळांच्या उभारणीसाठी परवानगी नाकारली. दुसरीकडे, कोकणी अकादमीसाठी तब्बल 10 कोटींचे, तर मराठीसाठी केवळ 2 कोटी रुपये अनुदान दिले जाते. यावरून हे सरकार अभिजात मराठी भाषेवर अन्याय करत असल्याचे सिद्ध होते.
अडीच हजार वर्षांहूनही अधिक उज्ज्वल इतिहास असलेल्या मराठी भाषेला राजभाषा बनवण्यासाठी मराठीप्रेमी 40 वर्षांपासून प्रयत्न करत आहेत; मात्र मराठी समाज विस्कळीत असल्यामुळेच या प्रयत्नांना आजवर यश आलेले नाही; पण आता मराठी राजभाषा झालीच पाहिजे. यासाठी निर्णायक चळवळ सुरू असून, सरकारला वेठीस धरल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्यामुळे 2027 च्या निवडणुकीपूर्वी गोव्यात मराठी मतपेढी झालीच पाहिजे, असे प्राचार्य वेलिंगकर म्हणाले.
मराठी राजभाषा निर्धार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर म्हणाले की, गोव्यात पूर्वांपार मराठी भाषेचा वापर होत आहे; मात्र स्वातंत्र्य काळात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढाकाराने कोकणीचा विकास झाला आणि पोर्तुगीजांनी याचे राजकारण केले. कोकणीचा विकास होण्याला विरोध नाही; मात्र जी मूळ भाषा आहे, तिलाच विसरणे मात्र दुर्दैवी म्हणावे लागेल. गोमंतकीय बोलणे, वाचणे, लिहिणे या सर्वांसाठी मराठीचा वापर करतात, मग कोकणी मातृभाषा कशी होईल, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. जर मराठी वाचली तरच संस्कृती वाचेल, हे सत्य आता प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे. कारण, मराठी भाषाच आपल्याला भविष्यात तारणार आहे. आपले मुख्यमंत्री अभिमानाने सांगतात की, मागील 50 वर्षांत जे झाले नाही, ते 5 वर्षांत त्यांनी कोकणी भाषेसाठी केले. ही जरी चांगली बाब असली तरी मराठी भाषेसाठी त्यांनी काय केले, याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.
मराठीला गोव्याची राजभाषा बनवण्यासाठी मराठी भाषिकांची चळवळ आणि एकजूट गरजेची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकुटुंब या चळवळीत सामील झाले पाहिजे. केवळ मराठीप्रेमी म्हणून न मिरवता आपले खरे योगदान देण्याची आता वेळ आल्याचे आवाहन वेलिंगकर यांनी केले.