

पणजी : हजारो वर्षांपासून गोव्याची लिहिण्याची, बोलण्याची आणि शिकण्याची भाषा मराठी होती. मराठीने गोव्याला संस्कार आणि राष्ट्रीयत्व दिले. भाषिक वैविध्य ही देशाची ताकद आहे, त्यामुळे भाषेत भेद नको. प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रेम करावे. पण, एक भाषा बोलणाऱ्याने दुसऱ्या भाषिकाची गळचेपी करू नये, असे स्पष्ट मत साहित्यिक आणि मराठी भाषेचे अभ्यासक परेश प्रभू यांनी मांडले.
गोवा बुक फेस्टिव्हलच्या निमित्ताने गोव्याचे कोकणी - मराठी - इंग्रजी बहुभाषिक भविष्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक रमेश घाडी व आपटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक विनय बापट होते. परेश प्रभू म्हणाले, गोव्यातील लोक मराठी भाषा आपली नाही, बाहेरची, महाराष्ट्राची आहे असे म्हणतात.
काहीजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी मराठी गोव्यात आली म्हणतात. पण, ते खरे नाही. आपल्याकडे १५२६ मध्येही मराठी होती याचे पुरावे आहेत. ताम्रपट, शिलालेख आणि पोथी यातून त्याचे पुरावे मिळतात. सगळे दस्तऐवज सेंट्रल लायब्ररीमध्ये जतन करून ठेवले आहेत. विद्यार्थी आणि तरुणांनी हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. एका वक्त्याने भाषा भांडत नाहीत, माणसे भांडतात असे म्हटल्याची आठवणही प्रभू यांनी सांगितली.
रमेश घाडी यांनी मी शेतकरी आहे आणि मातृभाषा कोकणी आहे, असे सांगितले. आपल्या कवितेचा, साहित्याचा जन्म कसा झाला, याबद्दलही ते बोलले. विनय बापट यांनी इंग्रजी ही संवादाची भाषा असली, तरी आपली मातृभाषा ही काळजाची भाषा असते. ती बोलण्यासाठी मनात भाषांतर करावे लागत नाही, असे सांगितले.