Manoj Bajpayee | अभिनय माझा श्वास; तो अखेरपर्यंत जगणार

मनोज वाजपेयी : कॅमेरा हेच आपले आयुष्य; स्वप्नपूर्तीसाठी मोठा त्याग
Manoj Bajpayee
Manoj Bajpayee | अभिनय माझा श्वास; तो अखेरपर्यंत जगणार
Published on
Updated on

दीपक जाधव

पणजी : मला अभिनयाची प्रचंड आवड आहे. अभिनय माझ्यासाठी फक्त व्यवसाय नाही, तो माझा श्वास आहे, माझं आयुष्य आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्यात खूप त्याग केला आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण मी मनापासून जगतो. माझ्यानंतरच्या पिढीतील कलाकारांचे काम पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळते. त्यांच्या कामातली प्रामाणिकता आणि ऊर्जा मला सतत उत्साहित ठेवते, असे उद्गार अभिनेता मनोज वाजपेयी यांनी ‘पुढारी’शी बोलताना काढले.

बँडीट क्वीनमधील छोट्या भूमिकेनंतर सत्यामधील भीकू म्हात्रेच्या व्यक्तिरेखेने सिनेसृष्टीत ओळख मिळालेले मनोज वाजपेयी यांनी शूल, राजनीती, पिंजर, अलीगढ, गँग्स ऑफ वासेपूर यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी सामाजिक आणि भावनात्मक स्तरांवर खोलवर जाणार्‍या भूमिका साकारल्या. स्पेशल 26, वजीर, नाम शबाना आणि सोनचिडियामधील त्यांच्या कामाचंही रसिकांनी भरभरून कौतुक केले. ओटीटीवर द फॅमिली मॅन मालिकेनं त्यांना नव्या पिढीतील प्रेक्षकांमध्ये अपार लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या अभिनयातली प्रामाणिकता, व्यक्तिरेखेत पूर्णपणे विलीन होण्याची क्षमता आणि जोखीम घेण्याची वृत्ती यामुळे ते रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. 56 व्या इफ्फीत हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

ते म्हणाले, नवीन संहिता येते त्यावेळी आवश्यक असेल तेव्हाच दिग्दर्शकाबरोबर) चर्चा होते. काही प्रसंग, काही संवाद, किंवा शुटिंगदरम्यान अचानक काही नवीन सुचल जातं. लेखक आणि दिग्दर्शकांसोबत सतत चर्चा, वादसंवाद चालू असतो. कारण त्यांनी ते लिहिलं आहे आणि आम्ही ते साकारतो आहोत, तर अभिनेता म्हणून आमच्याकडून येणार्‍या नव्या कल्पनांनाही ते महत्त्व देतात. मी थोडा भाग्यवान आहे, कारण मी सतत त्यांच्या मागे लागतो. माझी ही घाबरगुंडी त्यांनाही समजते. स्क्रिप्ट वाचताना प्रश्न निर्माण होतात आणि दिग्दर्शकांना पकडून चर्चा करावी लागते, पण ते प्रचंड व्यस्त असतात. वेळ काढून अर्धा तास बसून बोलणेही कठीण असते. त्यामुळे ही प्रक्रिया शुटिंग संपेपर्यंत चालूच राहते. पण या काळात मी नर्व्हस असतोच. मग मीच का एकटा नर्व्हस व्हायचे, म्हणून मग इतरांनाही थोडं नर्व्हस करतो.

ते म्हणाले, जेव्हा क्रिप्ट येते त्यानंतर त्याचे वाचन आणि तयारी सुरू होते. शुटिंगला जाताना कोणत्याही अभिनेत्याने पूर्ण तयारीनिशी जायचे असते. व्यावसायिक कलाकार म्हणून माझे कर्तव्य पार पाडायचे असते. तेच मी करत असतो. ते म्हणाले, मी अभिनयावर इतकं प्रेम करतो की कोणी मला “खूप पैसा देतो, घरी बस” असं म्हटलं तरी मी बसणार नाही. कारण नवनवीन वेशभूषा घालून संवाद म्हणणं, कॅमेर्‍यासमोर उभं राहून त्या जगात जगणं हेच माझं खरं आयुष्य आहे आणि ते मी अखेरच्या श्वासापर्यंत जपणार आहे.

भीकू म्हात्रे पात्राला समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. या चित्रपटात तुम्ही बॉसचे ऐकणारे होता. आता तुमचा बॉस कोण आहे, या प्रश्नवर बोलताना ते म्हणाले, माझ्या आयुष्यातली बॉस म्हणजे माझी मुलगी. ती मोठी होत आहे, त्यामुळे मला कसे वागायचे ते सांगायला लागली आहे. ती आता मला फॅशन शिकवते, माझे इंग्रजी सुधारते आणि मी तिचे हिंदी सुधारण्याचा प्रयत्न करतो. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चांगल्या कथांवर काम करण्याची संधी मिळाली. नव्या युगात, बदलत्या क्षेत्रात ओटीटी प्लॅटफॉर्म काम करताना अनेक जबाबदार्‍यांचे भान अभिनेत्याला राखावे लागते. कारण त्या प्लॅटफॉर्मवरील प्रक्षेकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. द फॅमिली मॅन सारख्या वेब सिरीजने हे सिद्ध केले आहे की मजबूत कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि दर्जेदार कलाकार यांच्या जोरावर यश मिळवता येते. त्यासाठी बॉलिवूडचे मोठे स्टार असण्याची आवश्यक नाहीत. द फॅमिली मॅन सीझन 3 चे नुकतेच ओटीटीवर प्रदर्शन झाले आहे. त्याला प्रेक्षकही दाद देत आहेत. त्यामुळे मागील दोन सीझनप्रमाणे हा सीझनही लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोव्यातील रसिकही प्रेमळ....

मी यापूर्वी अनेकदा इफ्फीसाठी गोव्यात आलो आहे. येथील माणसेही समुद्राप्रमाणे नितळ आहेत. येथील रसिक प्रेमळ आहे. त्यातही गोव्याची भाषाही मला प्रेमात पाडते. येथील लोक जेव्हा कोकणीत बोलतात, ते कळत नसले तरी कानाला आवडते, असेही वाजपेयी म्हणाले.

मनोरंजन क्षेत्रात मोठी क्रांती...

सिनेसृष्टीत होणार्‍या बदलाची दखल इफ्फीनेही घेतली आहे. इफ्फीत ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पुरस्कारही ठेवले जात आहेत. मनोरंजन क्षेत्रातही मोठी क्रांती होत आहे. ओटीटीसारखा कधी विचारही न केलेला प्लॅटफॉर्मला प्रेक्षक दाद देत आहेत. काळानुसार बदल स्वीकारत गेलो, तरच काळानुसार आपण पुढे जाणार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही वाजपेयी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news