

पणजी : पणजीचे आमदार पणजीकरांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहेत. पणजीत स्पांची संख्या वाढलेली आहे, बेकायदा गोष्टी वाढल्या आहेत त्यामुळे पणजीच्या नेतृत्वात बदल हवा, त्यासाठी येत्या महापालिका निवडणुकीत आपण पॅनल उभे करणार असून उमेदवार चाचपणी सुरू आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी दिली.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पर्रीकर म्हणाले, आमदार तथा मंत्री व महापौर लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. स्मार्ट सिटीच्या कामावेळी पणजीच्या लोकांना बराच त्रास झाला. पर्किंगची गंभीर समस्या आहे. स्पा आणि त्यामध्ये सुरू असलेली गैरकृत्य वाढत आहेत. आणि हे सारे बंद करण्यासाठी पणजी महापालिकेत सत्ता बदल हवी. त्यामुळे पणजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आम्ही सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.
स्थानिक आमदारास पणजीतील समस्यांचे काहीच देणे-घेणे नाही. त्यांना स्पाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतात. आपण स्मार्ट सिटीच्या कामावेळी वेळोवेळी आम्ही आवाज उठवला. त्यामुळे आता काही प्रमाणात वेळेवर कामे केली जात आहेत. आमदार फक्त आपले व्यावसायिक हित जोपासत आहेत. पणजीवासीयांना अंधारात ठेवत काही प्रकल्प आणले जात आहेत. स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी आवाज उठवायला हवा. तरच समस्या सुटतील, असे पर्रीकर म्हणाले. पूजा नाईक हिने नोकरी विक्री प्रकरणी जे आरोप केले आहेत, त्यांची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी यावेळी पर्रीकर यांनी केली.
जुन्ता हाऊसच्या जागी व्यापारी प्रकल्प नको
सरकार जुन्ता हाऊस आणि सरकारी गॅरेज पाडणार आहे. त्याजागी व्यापारी प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे चुकीचे आहे. पणजीकारांच्या हिताचे प्रकल्प पणजीत व्हावेत. व्यापारी नकोत, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.