

पणजी : मांडवी नदीच्या पात्रात ११२ मीटर लांबीच्या महाकाय तरंगत्या कॅसिनो जहाजाला विरोध तसेच यासंदर्भातची याचिका न्यायप्रविष्ठ असताना डेल्टिन कंपनीने जहाज अखेर मुरगाव बंदरात आणून नांगरल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. या जहाजाला गोव्यात नव्हे, तर मांडवी नदीत विरोध आहे. या जहाजाला सर्व परवाने असल्याचा दावा करत पावसाळ्यानंतर ते आणणे शक्य नसल्याने ते आधीच आणण्यात आले असून, शिपिंग एजंटाच्या निगराणीखाली ते बंदरात ठेवण्यात येणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
मुरगाव बंदरात दाखल झालेल्या महाकाय जहाजसंदर्भातच्या जनहित याचिकेवरील सुनावणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झाली. यावेळी खंडपीठाने या जहाजाच्या आगमनासंदर्भात कंपनीला जाब विचारला असता, ते पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे आणणे शक्य नाही. त्यामुळे ते आणण्यात आले असले, तरी उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय मांडवी नदीच्या पात्रात आणले जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले.
या महाकाय कॅसिनो जहाजामुळे त्याला विरोध करणारे वेरे तसेच पणजी येथील पर्यावरणप्रेमी पेटून उठले आहेत. या जहाजाला सर्व परवाने असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी त्या जहाजाची नोंदणी व तपासणी करण्यापूर्वीच हे परवाने कसे काय दिले, असा प्रश्न उपस्थित झाला होता. हे जहाज पार्क करण्याची जागाही निश्चित होऊन ते नांगरण्यासाठी तेथे कामही सुरू झाले होते. या जहाजामुळे नदीच्या पात्रातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून कंपनीच्या बाजूने सकारात्मक अहवाल दिला गेला आहे. उच्च न्यायालयाने या जहाजाला पावसाळ्यापूर्वी गोव्यात आणण्यास अंतरिम परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र, ती देण्यात आली नव्हती. न्यायालयाने कोणताच आदेश न दिल्याने अखेर कंपनीने उच्च न्यायालयाला न जुमानता तसेच सरकारच्या नाकावर टिच्चून हे जहाज अरबी समुद्रात आणून ठेवण्याचे धाडस केल्याने विरोधकांचा रोष वाढला आहे. मात्र, मांडवी नदीत येणार नसल्याचे आश्वासन कंपनीने दिल्यामुळे हा असंतोष काहीसा कमी झाला आहे.
यापूर्वीच पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो या संघटनेने मांडवी नदीच्या पात्रातील कॅसिनोंना विरोध करत आहेत. या कॅसिनो संबंधित खात्याच्या मंत्र्यांना तसेच खात्याच्या प्रमुखांना निवेदने देण्यात आली आहेत. या कॅसिनोमुळे पणजी शहरातील पार्किंग समस्या तसेच रहिवाशांना सोसावे लागणारे त्रास याची कल्पना देऊनही आतापर्यंत सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच आणखी नवीन महाकाय कॅसिनो जहाज आणण्यात येणार असल्याने इनफ इज इनफ संस्थेने हा विषय हाती घेऊन थेट उच्च न्यायालयातच प्रश्न नेला आहे.
जहाज मांडवीमध्ये येणार नाही : केदार नाईक
नवीन कॅसिनो जहाज मांडवीमध्ये आणले जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला दिलेले आहे. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्टीकरण गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक यांनी दिले. पणजी येथे आज बुधवारी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना नव्या कॅसिनो जहाजाबाबत विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. मांडवी नदीचे बेती बाजूचे पात्र हे साळगाव मतदारसंघामध्ये येत असल्यामुळे व त्याच फटका साळगाव मतदारसंघातील काही मच्छीमारांना बसणार असल्याने पत्रकारांनी नाईक यांनी विचारणा केली होती.
न्यायालयाची पूर्वपरवानगी घेऊ : डेल्टिनची हमी
मांडवी नदीत परवानगी देण्यात आलेले महाकाय कॅसिनो जहाज सध्या मुरगाव बंदरामध्ये नांगरून ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिल्यावर डेल्टिन कंपनीने हे जहाज न्यायालयाच्या परवानगीशिवाय मांडवी नदीत आणले जाणार नाही, अशी भूमिका खंडपीठासमोर स्पष्ट केली. त्यामुळे इनफ इज इनफ व पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो यांच्या याचिकांवरील सुनावणी ६ जुलैपर्यंत तहकूब केली. या जहाजासंदर्भात उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना नमूद केले की, या जहाजाच्या कंपनीकडे आवश्यक असलेले सर्व परवाने अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे कंपनीने हमी दिली की, संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक असलेले सर्व मान्यता तसेच परवाने व प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय तसेच न्यायालयाची परवानगी दिल्याशिवाय हे जहाज मांडवी नदीत आणले जाणार नाही. डेल्टिन कंनपनीच्या जुन्या कॅसिनो जहाजाचा परवाना नव्या जहाजाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्यास तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाईल, अशी भूमिका सरकारने मांडली. उच्च न्यायालयाने या सुनावणीवेळी महत्त्वाची भूमिका बजावताना हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नवीन महाकाय कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत प्रवेश देण्यापूर्वी किंवा कोणताही परवाना हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांना न्यायालयाची पूर्वपरवानगी बंधनकारक असेल, असे स्पष्ट केले.