

वाळपई : गोवा सरकारच्या कृषी खात्याच्या योजनेचे अंतर्गत सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील माळोली येथील ४५ जणांना बायोगॅस प्रकल्प मंजूर झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण ३८ जणांच्या जागेत पुनर्निर्मित बायोगॅस बांधण्यात आला. यावेळी वाळपई विभागीय कृषी खात्याचे अधिकारी विश्वनाथ गावस तसेच या योजनेसाठी विशेष मदत करणारे माजी पंच प्रशांत मराठे व इतरांची उपस्थिती होती. ही योजना सरकारने राबविली असून सध्यातरी माळोली या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
सदर योजना यशस्वी ठरल्यास पुढच्या वर्षी १०० जणांना अशा प्रकारचे बायोगॅस प्रकल्प देण्याचा विचार असल्याचे गावस यांनी स्पष्ट केले आहे. गोवा सरकारच्या कृषी खात्यातर्फे बायोगॅस योजना तयार करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे गाई, गुरे आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारची योजना ही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. गुरांच्या शेणापासून सदर बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होत असतो. बायोगॅस बांधणीला सुरुवात दरम्यान, बायोगॅस बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. एकूण ३८ जणांच्या जागेत सदर काम पूर्ण झाल्याची माहिती गावस यांच्याकडून प्राप्त झाली. एकूण ४५ जणांना याचा लाभ होणार आहे.
उर्वरिताना चार दिवसांत लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी माजी पंच सभासद प्रशांत मराठे विशेष प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांची आवश्यक स्वरूपाची कागदपत्रे तयार करून ती कृषी खात्याकडे सादर केली होती. सध्यातरी सदर योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली आहे. ही योजना यशस्वी झाल्यास येत्या काळाते १०० जणांना याचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून खात्यातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरे असणाऱ्यांसाठी लाभदायी योजना
ज्यांच्याकडे गुरे आहेत त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. दिवसेंदिवस घरगुती गॅसच्या दरात वाढ होत आहे. मात्र शेणापासून तयार होणारा बायोगॅस हा घरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकतो याची यशस्वी चाचपणी झाली आहे. शेणापासून बायोगॅस तयार झाल्यास त्याचा वापर आपण घरामध्ये करू शकतो. त्याच्यासाठी अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होणार असल्याचे समजते.