

डिचोली : गोवा सरकारने घोषित केलेल्या ‘माझे घर’ योजनेंतर्गत 1972 पूर्वीची घरे कायदेशीर करण्यासाठी सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज उपलब्ध करण्यात येतील. यासाठी संबंधित ग्रामस्थांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी येथे केले.
पाळी-कोठंबी पंचायतीच्या सुमारे पाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्या नूतन इमारतीची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच संतोष नाईक, जिल्हा पंचायत सदस्य, गोपाळ सुर्लीकर, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी, पंचायत सदस्य निशा नाईक, आशा गवळी, गणेश पाटवळकर, दीपक नाईक, शिवदास मुळ गावकर. प्रशिला गावडे, प्रसाद सावंत,गौरांगी परब, विविध सरपंच, पंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने घरांसंदर्भात घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
साखळी मतदारसंघात सहा पंचायत इमारतींच्या कामांची पूर्तता झाली. पाळीची ही इमारत जमीन प्रश्नामुळे विलंब झाला असला तरी जमीन दिल्याने आता वर्षभरात इमारत उभी होणार आहे. दोन मजली इमारतीत खाली दुकाने पहिल्या मजल्यावर कार्यालय व वर सभागृह असेल. त्याची योग्य निगा राखा व गावासाठी त्यांचा योग्य वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. सरपंच संतोष नाईक यांनी अनेक वर्षांचे स्वप्न साकार करणार असल्याचा आनंद असून, पाळी पंचायत क्षेत्राचा परिपूर्ण विकास होणार आहे. ज्यांनी ज्यांनी याकामी सहकार्य केले त्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
कोमुनिदाद व इतर संस्थांनी गावच्या विकासात सहकार्य करावे. सरकारची ‘माझे घर’ योजना असून, घरे कायम करण्यासाठी ग्रामस्थांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून एखादा तंटा असेल तर न्यायालयात न जाता सामोपचाराने सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच रोहिदास कानसेकर, कालिदास गावस व पंचायत सदस्य उपस्थित होते.