Mahesh Manjrekar on AI: 'एआय' मुळे चित्रपटांचे भवितव्य अंधकारमय; महेश मांजरेकर

भविष्यात दिवसाला एक लाख सिनेमा तयार होण्याची भीती
Mahesh Manjrekar on AI
Mahesh Manjrekar on AI
Published on
Updated on

प्रभाकर धुरी

पणजी: येत्या काळात एआय सिनेमाला गिळून टाकणार आहे, एआयमुळे सिनेमाचे भवितव्य अंधकारमय आहे,अशी भीती प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेता आणि महा मुलाखतकार महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

पणजी येथील कला अकादमीत जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्यात आली.याच संमेलनात त्यांना कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेल्या भाकिताबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी ही भीती पुन्हा व्यक्त केली. एआयमुळे वर्ष - दोन वर्षांत दिवसाला एक लाख सिनेमा तयार होतील,असेही ते म्हणाले.

मांजरेकर म्हणाले, एआय इतक्या बेमालूमपणे काम करेल की, हा सिनेमा एआय निर्मित आहे की शूट केलेला आहे, हेच कळणार नाही.एआयच्या मदतीने कुणीही पॅरिसमधील रस्त्यावरची फाईट दाखवू शकेल.त्यासाठी २५० माणसांचे युनिट पॅरिसला न्यायची गरज पडणार नाही. दोन वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांचे एकाच कलाकारात काँबिनेशन किंवा आपल्याला हवे असलेले वेगवेगळे संगीत व अन्य तांत्रिक बाजू एकाच दृश्यात किंवा गाण्यात आपण एआयमुळे दाखवू शकतो.आता फिल्म स्कूलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही,कारण एआय हाच प्रत्येकाचा शिक्षक असेल.असे असले तरी,छोट्या छोट्या कथा,लघुपट आणि नाटक यांना नक्कीच चांगले दिवस असतील.त्यामुळे ज्यांना अभिनयाची किंवा काही नवीन करण्याची आवड आहे त्या युवकांनी नाटक करावे.तिथे खूप करण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे. तामिळ निर्मात्यांना जसा सिनेमाचा अभिमान आहे,तसा मला नाटकाबद्दल अभिमान आहे,भरत जाधव हा माझा आवडता कलाकार आहे,कारण त्याने माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात भूमिका केली होती,असेही मांजरेकर म्हणाले.

मला क्रिकेटर व्हायचे होते; पण...

मांजरेकर म्हणाले, मी ठरवून काहीच केले नाही.सुरवातीला मला क्रिकेटर व्हायचे होते.रमाकांत आचरेकर माझे कोच होते.पण ते मला फलंदाजी करू देत नसल्याने मी क्रिकेट सोडले.त्यांना वाटायचे मी चांगला गोलंदाज होऊ शकेन.पण,मला त्यात रस नसल्याने मी क्रिकेटच सोडले.

तो काळ माझ्यासाठी खूप रोमँटिक

मांजरेकर म्हणाले, सुरुवातीला मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सहा महिने काम केले. त्यानंतर मी विंधन विहिरी (बोअरवेल) मारणाऱ्या गाडीवर काम करून जामखेड मध्ये ६० -७० विहिरीही मारल्या. या कामामुळे मी अनेकांशी जोडला गेलो,मला त्या वस्तीतील लोकांचे जगणे कळले. म्हणून तो काळ माझ्यासाठी खूप रोमँटिक होता.

निर्मात्यांची कार्यशाळा घेण्याचा माझा विचार

वर्षभरात ११० मराठी चित्रपट बनवले गेले.त्यातील काहीच चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक कोटीच्या घरात गल्ला जमवू शकले.हिंदी,तामिळ किंवा तेलगू चित्रपट कोट्यवधींची कमाई करतात. तुलनेत मराठी चित्रपट मागे का, या प्रश्नावर मांजरेकर म्हणाले,बजेट हे मुख्य कारण आहे.मराठी चित्रपट २- ४ कोटीत तर बाहुबली, कंतारा, आरआरआर सारखे चित्रपट ४०० कोटीमध्ये बनवले जातात.बजेटमुळे मराठी चित्रपट इतर प्रांतात किंवा परदेशात जाऊ शकत नाही. चित्रीकरण आणि प्रदर्शन आपल्याच प्रांतात करावे लागते.शिवाय मराठी भाषा इतर प्रांतांसाठी अडसर ठरते. आम्ही हिंदी किंवा तामिळ व तेलगू हिंदीत डब करून आमच्या गळी उतरवलेले चित्रपट पाहतो. मराठी चित्रपटांच्या बाबतीत इतर भाषिक ते पाहत नाहीत.आता सरकार मराठी चित्रपटांना १० कोटींपर्यंत अनुदान देण्याचा विचार करते, ही चांगली गोष्ट आहे. तथापि, सगळ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन एखादा मोठ्या बजेटचा चित्रपट बनवून प्रदर्शित करायला हवा. त्यासाठी निर्मात्यांची कार्यशाळा घेण्याचा माझा विचार आहे,असेही मांजरेकर यांनी सांगितले.

अभिनेता बनायचंय तर, दिग्दर्शकाचा सन्मान राखायला हवा

मांजरेकर म्हणाले, अभिनय शिकून येत नाही, तो आपल्याला येतो किंवा येत नाही. तो शिकून आला असता तर, अभिनयाचे प्रशिक्षण घेणारे सगळेच अभिनेते झाले असते. मी अशा अभिनय शाळांमध्ये विश्वास ठेवत नाही. मात्र,अभिनेता बनायचे असेल तर, प्रत्येकाने दिग्दर्शकाचा सन्मान राखायला हवा, कारण आपण कुठल्या भूमिकेसाठी योग्य आहोत हे आपल्यापेक्षा त्याला जास्त कळते, असेही त्यांनी सांगितले. मी चाळीत , गिरणगावांत वाढलो. तिथल्या युवकांचे,कामगारांचे दुःख जवळून पाहिले. माझ्यासोबत क्रिकेट खेळणारे २-४ जण एन्काउंटरमध्ये मारले गेले. त्यामुळे वास्तव विषयांवर लालबाग परळ,वास्तव, अस्तित्व सारखे सिनेमा करणे मला भावते.

...म्हणून मी मॉल मध्ये जात नाही

जिथे सर्वसामान्य कामगारांचे पोट भरणाऱ्या मिल (गिरणी ) होत्या,तिथे आता मॉल झालेत.मिल कामगारांना उध्वस्त करून गिरणगावांचे शांघाय केले गेले.त्यांच्या दुःखाचा त्रास मला अजूनही होतो,त्यामुळे मी मिलच्या जागी बांधलेल्या मॉलमध्ये कधीच खरेदीसाठी जात नाही,असेही मांजरेकर यांनी भावूक होत सांगितले. कंटेंट की स्टार महत्वाचा याचे उत्तर मांजरेकर यांनी कंटेंट असे दिले.विकी कौशलचे ५ चित्रपट चालले नाहीत ;पण छावा चालला,रणबीर सिंगचेही अनेक चित्रपट फ्लॉप झाले; पण धुरंधर चालला.याचे कारण कंटेंट हेच आहे.

...तर मराठी माणसाला घर मिळाले असते

मांजरेकर यांनी आपल्या चित्रपटातून मराठी माणसांची प्रतिमा बदलत नेली आहे. ते म्हणाले,गिरणी कामगारांमधील उणेपूरे १० टक्के लोक जिवंत असतील. अनेक मराठी माणूस मुंबई सोडून गेले. आई भीक मागू देईना , बाप चोरी करू देईना अशी तरुणांची अवस्था होती.त्यांनी झोपडपट्टी उभारली असती तर,त्यांना मुंबईत स्वतःचे घर मिळाले असते. पण,सरळमार्गी मराठी माणूस मुंबई सोडून गेला.सरकारने त्यांना पुन्हा मुंबईत आणून किमान २०० चौरस फुटाचे घर द्यायला हवे,अशी अपेक्षा मांजरेकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news