'महाराष्ट्रातील नेत्यांकडून गोव्यात शिवसेना वाढवण्याकडे दुर्लक्ष'

म्हणून पक्षाचे काम थंडावले, राज्य प्रमुख जितेश कामत यांची कबुली
Maharashtra leaders neglect to expand Shiv Sena in Goac
'महाराष्ट्रातील नेत्यांकडून गोव्यात शिवसेना वाढवण्याकडे दुर्लक्ष' File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर गोव्यातील शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ दिली. गोव्यातील अस्तित्वात असलेली शिवसेना त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर गेले वर्षभर या पक्षाचे काम पूर्णपणे थंडावले आहे. याबाबत पत्रकारांनी गोवा राज्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य प्रमुख जितेश कामत यांना विचारले असता, महाराष्ट्रातील नेत्यांनी गोव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच पक्षाचे काम थंडावले आहे. अशी कबुली दिली. महाराष्ट्रातील नेत्यांचे गोव्यातील नेतृत्वाला पाठबळ मिळत नसल्यामुळे व तेथील नेत्यांनी सर्व बळ महाराष्ट्रात एकत्रित केल्यामुळे गोव्यातील शिवसेना पक्ष वाढत नाही असे कामत म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उदय होण्यापूर्वी पासून शिवसेनेचे अस्तित्व होते. गावागावांमध्ये शिवसेनेच्या शाखा होत्या. महाराष्ट्र नंतर गोवा हेच राज्य शिवसेनेचा पूर्ण विस्तार झालेले होते. मात्र महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांनी गोव्याकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवल्यामुळे गोव्यात शिवसेना वाढली नाही. अनेक निवडणुका लढवुनही एकही आमदार शिवसेनेला गोव्यात निवडून आणता आलेला नाही. भाजपने तीनवेळा सत्ता मिळवली. सध्या भाजपचे ४० पैकी २८ आमदार आहेत.

खासदार संजय राऊत यांच्यासारखे नेते गोवा संपर्कप्रमुख राहून सुद्धा गोव्यात पक्ष वाढला नाही. आता तर या पक्षाचे अस्तित्वच पणाला लागले आहे. राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या सांगण्यानुसार नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रातील नेते गोव्यातील शिवसेनेच्या कामाकडे लक्ष घालणार आहेत. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच गोव्यातील उबाठा शिवसेनेच्या अस्तित्वाची कसोटी लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news