

पणजी : ‘त्या’ वक्तव्याबाबत मगो पक्षातर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी चर्चा झालेली आहे. या वादावर आमच्या पक्षातर्फे पूर्णविराम देण्यात आल्याची माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली आहे. या विषयासंदर्भात खासदार तानावडे यांच्याशी चर्चा केल्याचे दीपक ढवळीकर यांनी म्हटले असून अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी 2027 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि मगोपची युती होईल आणि मगोप 7 ते 8 जागा लढवेल असे म्हटले होते. याबरोबरच त्यांनी प्रियोळ हा मतदारसंघ आपला मतदारसंघ असून, आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावर या मतदारसंघाचे आमदार आणि कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आक्षेप नोंदवत, वरिष्ठांकडे तक्रार केली होती.
भाजपमध्ये सध्या अंतर्गत निवडणुका सुरू असून, सर्वांचे लक्ष प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. याबाबत तानावडे म्हणाले, या पदासाठी मी इच्छुक आहे की नाही? यापेक्षा इतरांना संधी मिळाली पाहिजे. देशात केवळ गुजरात आणि गोव्यातील प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्तीने संपूर्ण टर्म पूर्ण केली आहे. इतरांना वेळोवेळी बदलण्यात आले आहे. त्यामुळे पदाची कोणतीच अपेक्षा नसून, आपण जोपर्यंत या पदावर होतो, तोपर्यंत त्या पदाला न्याय देण्याचे काम केले. पक्षात या पदासाठी अन्य उमेदवारही सक्षम असून त्यांना संधी मिळावी यासाठी आपणच वरिष्ठांना तशी विनंती केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जाईल.
पणजी : राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार कार्यरत असले, तरी युतीधर्माचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.
खासदार तानावडे म्हणाले, 2027 च्या विधानसभा निवडणुकीला अद्यापही वेळ आहे; मात्र मगोपसोबत युती करावी, असे पक्षाच्या स्थानिक आणि केंद्रीय नेत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे 2027 च्या निवडणुकीमध्ये युती असेल आणि
कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्यात? आणि त्या कोणत्या असाव्यात? याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकत्रित बैठकीत घेतला जाईल. त्यामुळे आता या संदर्भात वक्तव्य करताना जपून करावीत, जर भाजपच्या विद्यमान आमदार आणि मंत्र्याच्या जागेसंदर्भात कोणी असे वक्तव्य केल्यास ते त्या आमदाराचे खच्चीकरण केल्यासारखे होईल. त्यामुळे पक्ष याबाबत दक्ष असून इतर पक्षाच्या नेत्यांनी याबाबत काळजी घ्यावी.