

पणजी : निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागातर्फे निवृत्ती वेतनधारकांसाठी हयातीचा दाखला सादर करणे सुलभ करण्यासाठी आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानाद्वारे राष्ट्रव्यापी डीएलसी मोहीम 3.0 पासून सुरू होत आहे. याद्वारे निवृत्ती वेतनधारकांना अँड्रॉइड स्मार्टफोनवरून आधार ओळखपत्राद्वारे प्रमाणपत्रे दाखल करता येणार आहेत.
निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विविध डिजिटल पद्धतींचा वापर करण्यास मदत करण्यासाठी या शिबिरांना निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव दीपक गुप्ता भेट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात सोमवारु 11 रोजी अनेक ठिकाणी त्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने ही शिबिरे पणजी सचिवालय आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हापसा शाखेत आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये निवृत्ती वेतनधारकांना तांत्रिक अडचणी आल्यास उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन वितरण प्राधिकरणांना भेट द्यावी लागू नये, यासाठी 2014 मध्ये विभागाने डिजिटल जीवन प्रमाण सुरू केले. 2021 मध्ये फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान सुरू केले. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ झाली. अनेक वयोवृद्ध आणि दिव्यांग निवृत्ती वेतनधारकांना प्रत्यक्ष या प्रकिया करणे शक्य नसल्याने, त्यांच्या सुलभतेसाठी ही उपाय योजना सुरू करण्यात आली आहे.