Goa Quepem Leopard Attack | केपे-कोळंबीत बिबट्याचा वावर

Goa Quepem Leopard Attack | हल्ल्यात वासरू ठार; उपाययोजनेची नागरिकांची मागणी
Leopard attack
Leopard attackPudhari
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

केपे तालुक्यातील कोठंबी गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील एका लहान वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्या गावातील रस्त्यांवरून फिरताना दिसत असल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Leopard attack
Palghar Leopard Attack | काष्टी येथील आणखी एक गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी!

स्थानिकांच्या माहितीनुसार, कोठंबी परिसर जंगलालगत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर नवीन नाही. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्याचे दर्शन अधिक वारंवार होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्यावेळी गावातील रस्ते ओलांडताना तसेच काही घरांच्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी गावातील एका पशुपालकाच्या लहान वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. वन खात्याकडून गावातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेरांच्या माध्यमातूनबिबट्याचा वावर, त्याचे मार्ग आणि हालचालींची माहिती मिळवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, अशा सूचना वन खात्याने दिल्या आहेत. बिबट्याचा वावर अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पशुपालकांचे आर्थिक नुकसान

पशुपालन हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने अशा घटनांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

Leopard attack
Palghar Leopard Attack | काष्टी येथील आणखी एक गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी!

पिंजरा लावून बंदोबस्त करा

दरम्यान, ग्रामस्थांनी वन खात्याकडे तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नियमित गस्त, जनजागृती आणि आवश्यक असल्यास पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या वन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कोटंबी गावातील नागरिक मात्र भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत.

वनअधिकाऱ्यांची भेट, आश्वासन

घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी कोठंबी येथे दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news