

सांगे : सांगे मतदारसंघातील विलियन गावात सुभाष गावकर यांच्या घरात बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. सुदैवाने बिबट्याने कोणालाही इजा केली नसल्याने घरातील लोकांनी सुस्कार सोडला.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 6 वा. गावातील मुख्य रस्त्याने बिबट्या चालत येताना त्यांनी पाहिला. गावातील लोकांची बिबट्याला पाहण्यासाठी एकच धावपळ उडाली. जमलेल्या लोक असूनही बिबट्याने एकाही व्यक्तीला न पाहता सरळ सुभाष गावकर यांच्या मागील दारातून घरात प्रवेश केला व बाथरूममध्ये ठाण मांडून बसला. हे पाहून घरच्या लोकांनी मागील दाराला व पुढील दाराला कडी लावली व वन खात्याच्या अधिकार्यांनी घटनेची माहिती दिली.
वनखात्याच्या कर्मचार्यांनी तातडीने येऊन पुढील दरवाजा खालून कापून आत प्रवेश केला व जाळीच्या आधाराने बिबट्याला पकडले. दिवसेंदिवस रानटी जनावरे रस्त्यावर आलेली पहायला मिळतात. संध्याकाळी 7 नंतर गव्यामुळे उगे गावाबाहेर रस्त्यावरून जाणे धोक्याचे ठरत आहे. याबाबत ग्रामस्थ म्हणाले, वन खात्याने जनावरांसाठी रानात फळे व पाण्याची व्यवस्था करायला हवी होती. रानात पाण्यासाठी तळ्यांचे काम केले असते तर जनावरांनी तिथेच तहान भागवली असती. जंगलात पाणी नसल्याने तहानलेल्या जनावरांना पाणी पिण्यासाठी गावात येतात.