Goa News| बाहेरील लोकांना जमीन विकण्यासाठी मालकच जबाबदार

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक; शेती आणि व्यवसाय विकसित करा
Goa News
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
Published on: 
Updated on: 

पणजी : राज्यातील जमीनमालक स्वतःच्या जमिनी बाहेरील लोकांना विकतात आणि बाहेरील लोक त्यावर मोठे प्रकल्प उभारतात. मात्र, यासाठी सरकारला दोष दिला जातो. सरकार जमिनी बाहेरील लोकांना विकत नाही, हे सत्य लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे गोवेकरांनी जमिनी विकण्याऐवजी शेती, भाजीपाला उत्पादन आणि व्यवसाय विकसित करावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाईक म्हणाले की, राज्यातील जमिनी सुरक्षित राहाव्यात आणि त्या बाहेरील लोकांना विकल्या जाऊ नयेत, यासाठी जनजागृतीबरोबरच भूमीच्या संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. भाटकरांसह खासगी जमीनमालक गोव्याच्या जमिनी बाहेरील लोकांना विकण्यासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांसाठी सरकारला दोष देऊ नये, असेही ते म्हणाले. जमीन विकणाऱ्या लोकांचे काँग्रेसशी संबंध होते, असा दावा नाईक यांनी केला. एखादी व्यक्ती आपल्या राज्याबाहेर जमीन खरेदी करू शकते. याच कायद्यानुसार बाहेरील लोक गोव्यातील जमिनी खरेदी करत आहेत. मात्र, गोवेकरांनी बाहेरील लोकांना जमिनी विकल्या नाहीत, तर अशा व्यवहारांना आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.

कृषी योजनांचा लाभ घ्या...

गोवेकरांनी आपली जमीन न विकता व्यवसाय किंवा कृषी उपक्रम विकसित करावेत. सरकार शेतीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देते आणि कृषी क्षेत्रासाठी विविध योजना राबवते. या योजनांचा लाभ घेऊन शेती उत्पादन वाढवावे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवावा, असे आवाहनही नाईक यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news