

पणजी : बनावट कागदपत्रे सादर करून जमीन हडप करण्याच्या रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या रॉयसन रॉड्रिग्जला दोन प्रकरणांमध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तपास यंत्रणा त्याच्या वाढीव कोठडीची आवश्यकता पटवून देण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला हा जामीन म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने मंजूर केला.
संशयित रॉयसन रॉड्रिग्ज याच्यामार्फत अॅड. साहिल सरदेसाई यांनी बाजू मांडताना बनावट मालमत्ता कागदपत्रे व कथित कोट्यवधी रुपयांच्या जमीन हडप प्रकरणाची माहिती न्यायालयासमोर दिली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून संशयित न्यायालयीन कोठडीत आहे; त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा, अशी बाजू मांडली तर तपास अधिकार्यांनी त्याला विरोध केला. गुन्ह्याचे गांभीर्य तसेच पुरावे व साक्षीदारांना असलेला धोका लक्षात घेऊन त्याला जामीन दिला जाऊ नये, अशी विनंती केली.
या क्षणी त्याला जामिनावर सोडल्यास तो तपासकामात छेडछाड करू शकतो तसेच साक्षीदारांना धमकावू शकतो. त्यामुळे तपासकामात अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा सरकारतर्फे करण्यात आला. जामीन नाकारून त्याला न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याइतपत तपास अधिकार्याने आवश्यक ते पुरावे सादर केलेले नाहीत.
त्याच्यामुळे कोणतीही भीती निर्माण होण्याची, दस्तावेजात छेडछाड करील किंवा साक्षीदारांना धमकावेल यासंदर्भात कोणतेही उदाहरण किंवा ठोस माहिती दिली नाही. संशयिताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी दिलेली कारणे पुरेशी नाहीत, त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात केले आहे.