पणजी : कोकण रेल्वेतून विना तिकीट प्रवास रोखण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांना सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे त्यांच्या मार्गावर सलग तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. जानेवारी 1 ते 31 जुलै या सात महिन्यात आत्तापर्यंत 3,765 तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आल्या आहेत.
या मोहिमांमध्ये, अनियमित प्रवाशांची 40,602 प्रकरणे शोधून त्यांना दंड करण्यात आला, ज्यामुळे दंडाद्वारे 2,37,11,161 रुपये वसूल करण्यात आले. कोकण रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. येणार्या गणेश चतुर्थी उत्सवामुळे, कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तिकीट तपासणी मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.