

नाशिक : गोव्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना उत्तराखंडकडे घेऊन जाणार्या दोन संशयित मुलांना नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेसमधून ताब्यात घेत अपहरणाचा डाव उधळून लावला. संशयितांपैकी एक अल्पवयीन आहे. या चौघांना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गोव्यातील कोंकोलीम पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 5) दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तेथील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन मुलांसमवेत त्या रेल्वेने मुंबईला गेल्याचे आढळले होते. मुंबईतील रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज गोवा पोलिसांनी तपासले असता, ते लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्स्प्रेसने नाशिकला रवाना झाल्याचे आढळले. गोवा पोलिसांनी तत्काळ नाशिकरोड पोलिसांना याबाबत सतर्क केले.
ही एक्स्प्रेस रविवारी सकाळी 11 ला नाशिकरोड स्थानकात येताच पोलिसांनी तातडीने सर्व बोग्या तपासत संशयित मोहम्मद राशीद (23, रा. हादिया, प्रयागराज, उत्तर प्रदेश) व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा तसेच त्यांच्या ताब्यातील 16 आणि 15 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. चाइल्ड हेल्पलाईनच्या उपस्थितीत नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले. कोंकोलीम पोलिस ठाण्यात अपहरण तसेच गोवा चिल्ड्रेन क्ट 8(2) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी आपण मुलींशी विवाह केला असून, प्रेम असल्याचे सांगितले, तर त्यातील एक मुलगा फोनवर कोणाला तरी दस हजार रुपये भेजो, असे सांगत असल्याचे पोलिसांना आढळले. उत्तर भारतात नेमक्या कोणाशी ते संपर्कात होते, याचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहेत.