

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार उच्च न्यायालयातील ५ न्यायमूर्तीना बढती देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये गोव्याचे माजी प्रसिद्ध वकील न्यायमूर्ती महेश एस. सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती करण्यात आली आहे. ते ८ जानेवारी २०२६ रोजी या पदाचा ताबा घेतील. तसेच विद्यमान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक यांचे शिक्षण गोव्यात पूर्ण झाले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एलएल.बी. पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. झेवियर सेंटर ऑफ हिस्टोरिकल रिसर्चकडून पोर्तुगीज भाषेचा डिप्लोमा त्यांना प्रदान करण्यात आला. ऑक्टोबर १९८८ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दिवाणी व घटनात्मक कायदा, कामगार व सेवा कायदा, पर्यावरण कायदा, वाणिज्य व कर कायदे, कंपनी कायदा आणि जनहित याचिकांमध्ये वकिली केली. केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील, राज्य सरकार आणि वैधानिक महामंडळांसाठी विशेष वकील म्हणून काम केले. २१ जून २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली व सध्या ते न्यायमूर्ती म्हणून काम पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इतर चार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची बढती मुख्य न्यायमूर्तीपदी केली आहे त्यामध्ये अलाहाबादचे मनोज कुमार यांची उत्तराखंडचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून, मुंबईच्या रेवती पी. मोहिते डेरे यांची मेघालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून, केरळचे ए. मुहम्मद मुस्ताक यांची सिक्कीमचे मुख्य न्यायमूर्ती तर ओरिसाचे संगम कुमार साहू यांची पाटणाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली.