

जोतिबा डोंगर : ‘दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, आसमंत व्यापून टाकणारी गुलालाची उधळण आणि देवी चोपडाईच्या दर्शनासाठी जमलेला लाखो भाविकांचा महासागर... अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर बुधवारी अक्षरशः न्हाऊन निघाला. आज गुरुवारी यात्रेचा मुख्य सोहळा होणार आहे.
चैत्र यात्रेनंतरची सर्वात मोठी दुसरी यात्रा असलेल्या चोपडाईदेवी श्रावण षष्ठी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविकांनी अलोट गर्दी केली होती. बुधवारी पहाटे काकड आरतीनंतर दख्खनचा राजा जोतिबा आणि चोपडाईदेवी यांच्या मूर्तींना अभिषेक करून आकर्षक महापूजा बांधण्यात आली. दिवसभर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्लास्टिकबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्या वापरणार्या व्यापार्यांवर ग्रामपंचायतीच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने डोंगरावरील खाद्य दुकानांची पाहणी करून पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी केली. दख्खन केदार ट्रस्ट आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत हॉलमध्ये भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला.