

पणजी : किनारी राज्यांतील मॉडेल राज्य म्हणून गोवा विकसित होत आहे. गोवा मेरीटाईम लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या जलवाहतूक प्राधिकरणाने गोव्यातील जलमार्ग विकासासाठी 200 कोटींची मदत केली असून, त्या माध्यमातून राज्यात नवे जलमार्ग तयार केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सोमवारी मुंबई येथे आयोजित इंडिया मेरीटाईम परिषदेच्या उद्घाटन सत्रात डॉ.सावंत बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जहाज आणि बंदरे खात्याचे मंत्री सर्वानंद सोनवाल तसेच गुजरात व ओडिसाचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की इंडिया मेरीटाईममध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी गोवा तयार आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मासेमारी व्यवसायापासून ते क्रुझ पर्यटनापर्यत गोव्यात सागरी उपक्रम सुरू आहेत. गोव्यात मोठ्या प्रमाणात जहाज बांधणी करून ती निर्यात केली जात आहे, सागरमाला प्रकल्पाअंतर्गत अनेक सुविधा उपलब्ध करताना जलपर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. शाश्वत किनारी सुरक्षा सोबतच जहाजबांधणी, मच्छीमारांचे हित जपत कू्रझ पर्यटनाला पाठिंबा देऊन त्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत. विकसित भारत 2047 हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सागरमाला व पीएम गतीशक्ती या योजना सहाय्यभूत ठरणार आहे. जेटींचे आधुनिकीकरण, फेरी टर्मिनल बांधणे आणि जल वाहतूक सुधारणे यासाठी भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने 200 कोटी रुपये वाटप केले आहेत आणि आम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा सागरी क्लस्टर स्थानिकांना आणि बोट बांधणार्यांना सक्षम बनवते, मुरगाव बंदर प्राधिकरण हे एक धोरणात्मक प्रवेशद्वार आहे आणि आता ते लॉजिस्टिक्स, क्रूझ पर्यटन आणि अक्षय ऊर्जा कार्गोमध्ये विस्तारत आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड स्वदेशी संरक्षण उत्पादनात आघाडीवर आहे, नौदल, तटरक्षक दल आणि मित्र राष्ट्रांसाठी जहाजे बांधत आहे. सागरमाला आणि पीएम गतीशक्तीद्वारे, गोवा वाहतूक जलद, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी कनेक्टिव्हिटी आणि जलमार्ग अपग्रेड करत आहे. गोवा मेरीटाईम क्लस्टर भारतातील पहिले आहे जे स्थानिकांना जहाज दुरुस्ती, बोट बिल्डर्स आणि तयार करण्यास सक्षम करते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.