

पणजी : दीर्घकाळापासून फरार असलेला इस्रायली ड्रग्ज माफिया यानिव बेनाइम उर्फ 'अटाला' अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. आज सकाळी मेरशी येथील सत्र न्यायालयात तो आपल्या वकिलासह हजर झाला. न्यायालयाने त्याची रवानगी थेट कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अटाला याला १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयात हजर झाल्यानंतरच त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
अटाला याला ५ एप्रिल २०२५ रोजी शिवोली येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून ५० ग्रॅम कोकेन आणि १२० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
विशेष एनडीपीएस न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, गोवा सरकारने या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. अटालाचा गुन्हेगारी इतिहास आणि पूर्वी फरार होण्याचा अनुभव लक्षात घेता, उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच, त्याला विशेष न्यायालयात नव्याने अर्ज करण्याची संधी देत, निर्णयापर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.
कोर्टाचे आदेश डावलून झाला होता फरार
त्यानंतर अटालाने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला. मात्र, अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) त्याला तीव्र विरोध केला. जामीन अर्जावरील निर्णयाच्या वेळी हजर राहण्याचे आदेश असूनही अटाला न्यायालयात उपस्थित राहिला नाही.
विशेष न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळताच तो शिवोली येथील खोली सोडून सामानासह गायब झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 'लुकआऊट नोटीस' (LOC) जारी केली होती, पण तो सापडत नव्हता.
सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद
विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अटाला याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. आज या अर्जावर सुनावणीदरम्यान सरकारी वकील सोमनाथ कर्पे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
"संशयित आरोपी जामीन नाकारल्यानंतर सामानासह फरार झाला होता आणि त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी आहे. त्यामुळे आधी त्याला न्यायालयात शरण येण्याचे निर्देश द्यावेत, त्यानंतरच त्याच्या अर्जावर सुनावणी व्हावी," असा जोरदार युक्तिवाद ॲड. कर्पे यांनी केला. उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत अटाला याला शरण येण्याचे आदेश दिले होते, ज्यानुसार आज तो न्यायालयात हजर झाला.