

पणजी : सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणार्या इराणी टोळीतील दोघांना जुने गोवे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिल्मी स्टाईलने पकडले. यावेळी संतप्त लोकांनी या दोघांना बर्यापैकी चोप दिला. त्यामुळे त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकजण ठाणे येथील तर एकजण नाशिक येथील असून अब्बास अस्लम झैदी (वय 34, रा. भास्कर स्चूलजवळ, पाटीलनगर, अंबिवली तर्फ चोण, ठाणे, महाराष्ट्र) व शरीफ शहा (रा. हनुमान नगर, पाटील गॅरेजमागे, चांदवड रोड, मनमाड,
नाशिक, महाराष्ट्र) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनी
गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. विशेष म्हणजे
या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस कॉन्स्टेबल देवेंद्र तारी
यांनी व त्यांच्या सहकार्यांनी दमदार कामगिरी केली. या दोघांच्या म्हापसा व जुने गोवे येथील एकूण चार प्रकरणांत सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7.45 वा. म्हापसा येथील शेळपे, धुळेर येथे, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी तक्रारदार गीता शिरोडकर (वय 63) यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात, म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या घटनेनंतर गोव्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस आणि व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे सतर्क करण्यात आले.
यादरम्यान, सकाळी 10.50 वा. देवेंद्र तारी आणि इतर बीट कर्मचार्यांनी गस्त घालत असताना, मेरशी येथील एका बारजवळ एका दुचाकीवर (एमएच14-ईडब्ल्यू-3215) पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनाचे दोन संशयित दिसल्यावर त्यांनी दोन्ही संशयितांचा पाठलाग केला आणि नागरिकांच्या मदतीने, अब्बास अस्लाम झैदी याच्या मुसक्या आवळल्या. मात्र, दुचाकी चालवणारा दुसरा संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पण, नंतर मेरशी येथील अपना घर जवळच्या डोंगरावरील झुडुपात नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली आणि शरीफ शहा यालाही जेरबंद करण्यात आले. संतप्त जमावाने यावेळी दोघा संशयित आरोपींना बदलडल्याने त्यांना उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदेश नाईक आणि जुने गोवेचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. दोन्ही संशयित आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत.
आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता
28 फेब्रुवारी 2025 रोजी 3.55 वा. तक्रारदार सुप्रिया दीपक शिरोडकर (वय 45, रहिवासी भाटीवाडो, पर्रा,म्हापसा) यांच्या गळ्यातील 28 ग्रॅम वजनाचे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. तर आणखी एका घटनेत 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वा. तक्रारदार वैभवी वेंकटेश पेडणेकर, (45, रा.कारस्कोवाडो, पर्रा,म्हापसा) यांच्या गळ्यातील 2 लाखांपेक्षा अधिक किमतीचे 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. याशिवाय त्यांनी क्रिस्टलिना फॉस्टो फर्नांडिस (49, बामनभाट, मेरशी) यांच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.45 वा. त्या कामावर जात असताना कैतानवाडो-मेरशी येथून हिसकावून नेली होती. या चार प्रकरणांचा चौकशीत खुलासा झाला असून, आणखीही काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.