

म्हापसा : कोलवाळ येथे दोन मद्यधुंद पर्यटक महिलांनी रस्त्यावर धिंगाणा घातल्यामुळे बराच काळ वाहतूक खोळंबली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ही घटना घडली. ही घटना कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहासमोर असलेल्या सर्व्हिस रोडवर घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या दोन महिला रस्त्यामधोमध बसून मद्यपान करीत होत्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता.
मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने भर रस्त्यावर एक बाटली फोडली आणि आरडाओरडा करून गोंधळ घालायला सुरुवात केली. यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी पोलिस व 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. यानंतर दोन्ही महिलांना म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथेही त्यांनी गोंधळ घातला. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने तेथील सुरक्षा कर्मचार्यांशी गैरवर्तन केले तर दुसरी महिला बेशुद्ध होती. या प्रकरणी कोलवाळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.