पणजी : जागतिक योग दिन शनिवारी 21 रोजी राज्यभरात साजरा केला जाणार आहे. राज्यभरात 15 हजार ठिकाणी योग दिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
देशाच्या इतर भागांसह संपूर्ण गोव्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. शाळा, विद्यालये, सरकारी कार्यालये, पोलिस स्थानके, पंचायती मिळून प्रत्येक गावात योग दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. मुख्य राज्यस्तरीय कार्यक्रम सकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत ताळगाव येथील डॉ. श्यामा-प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होणार आहे. या आयोजित कार्यक्रमाची नोंदणी ‘योगसंगम’ या आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आयुष मंत्रालयाच्या पोर्टलवर माहिती द्या...
’एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या घोषवाक्यासह आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळा तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांनी यात सहभागी होऊन आपले योग दिनाचे कार्यक्रम आयुष मंत्रालयाच्या पोर्टलवर अपलोड करावेत, तसेच प्रत्येक शाळेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकाळी 6.30 वा. होणार्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवावे, असे निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.

