

गोवा : सिंधुदुर्गमधल्या कणकवली तालुक्यातील वरवडे गावात राहणारी, सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली लक्ष्मी भगवान सादये गोव्याच्या राजधानीत दररोज खाकी गणवेशात, ऊन, पाऊस, वारा कसलीच तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावताना दिसते. बदलत्या काळानुसार पुरुष मक्तेदारी असलेल्या सर्वच क्षेत्रात आता महिलांनी आपली विशेष छाप उमटवली आहे. तशीच ओळख निर्माण करणारी गोव्याची 'पोस्टवूमन' लक्ष्मी सादये हिच्याबद्दल जाणून घेऊया.
अतिशय सरळ, साधी, मितभाषी आणि आपल्या परिस्थितीची जाणीव असलेली लक्ष्मी, आई-वडिलांच्या छत्रछायेखाली शिक्षण, घरकाम, शेती करत मोठी झाली. पूर्वी बाबा फक्त शेती करत असल्याने घरची आर्थिक परिस्थिती तितकी बरी नव्हती. मात्र बाबा पोस्टात ग्रामीण डाक सेवक बनले. त्यानंतर त्या कुटुंबाला एक नवी दिशा मिळाली. बाबांची लाडकी आणि बाबा तिचे आवडते असलेली लक्ष्मी स्वतःही बाबांच्याच पावलांवर चालत ग्रामीण डाक सेवक बनली. आई-बाबा, लहान बहीण आणि ती अशा छोट्या आणि सुखी कुटुंबात आपलाही खारीचा वाटा म्हणून ती देखील पोस्टात काम करू लागली. पुढे बढती मिळाली आणि तिने थेट गोवा गाठले.
राजधानीत आल्यानंतर नवीन शहर, वेगळी भाषासंस्कृती या सगळ्यांचा सामना तिला करावा लागला. मात्र मुळातच भक्कम असलेल्या लक्ष्मीने या सगळ्याशी जुळवून घेतले. सगळे सुरळीत असतानाच तिच्या बाबांचे छत्र तिच्यावरून हरपले. लहान बहिण आणि आईला आता केवळ तिचाच आधार उरला. या परिस्थितीतही न डगमगता, तिची न थांबणारी पावले हातात पोस्टाची पार्सल घेऊन राजधानीतील इमारतींच्या पायऱ्या चढत आहेत.
प्रत्येक मुलीमध्ये एक आई दडलेली असते. लक्ष्मीचे बाबा गेल्यानंतर तीच तिच्या लहान बहिणीची आणि आईचीही 'आई' बनली. सकाळी ५ वाजता उठून स्वयंपाक आवरून ८ वाजता कार्यालयात पोहोचणे, त्यानंतर सर्व स्पीडपोस्ट, रजिस्टर, पार्सल, साधी पत्रे यांचे वर्गीकरण करून तिला नेमून दिलेल्या भागात ती संदेश पोहोचवायला निघून जाते. दिवसभर कैक इमारती चढून - उतरून, दिवसाला ८० ते १०० पार्सल पोच करून, तब्बल ८ ते १० किलोमीटर पायी चालूनही तिच्या चेहऱ्यावर कधीच थकवा जाणवत नाही. जणू नकळत आलेल्या जबाबदारीने तिच्याकडून थकण्याचाही अधिकार हिरावला असावा.
लक्ष्मी सांगते की, अनेकदा काम करता करता जीव थकून जातो, सगळे काही सोडून निघून जावेसे वाटते. बाबांची आठवण आली की मग अस्वस्थ होते. पण अशावेळी त्यांचे धीराचे शब्द आठवतात आणि पुन्हा सारे दुःख झटकून मी नव्याने उभी राहते. मनात विचारांचे वादळ निर्माण झाल्यास मेडिटेशन करते. समाजात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धीराने आपले काम करत राहणे गरजेचे आहे, इतर माणसे येतात जातात, मात्र आई-वडील हेच आपल्या सोबत असतात. आपल्यासाठी काय योग्य? काय अयोग्य? याची ओळख ठेवून आपण चालत राहिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या स्वयंसिद्धेला पुढारीचा सलाम!
मी विज्ञान शाखेत शिकले. मला रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रमध्ये विशेष रुची आहे. जर मी पोस्टमन नसते, तर मी नक्कीच रसायनशास्त्राच्या लॅबमध्ये काम करणे पसंद केले असते. याशिवाय मला फोटोग्राफीची देखील आवड आहे. मोकळ्या वेळेत पुस्तक वाचणे ही सुद्धा माझ्या हृदयाजवळची गोष्ट, असे लक्ष्मी सांगते.