

Intern Doctor Found Dead at Hawaii Beach in Dona Paula Goa
पणजी : दोना पावला येथील हवाई बीच परिसरात बुधवारी सायंकाळी २३ वर्षीय इंटर्न डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते आणि ती सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत होती.
मृतदेहाजवळ आढळलेल्या तिच्या नावाच्या डॉक्टरांच्या गाऊनवरून पोलिसांनी तिची ओळख पटवली. तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ती समुद्रकिनारी एकटी आली होती की तिच्यासोबत आणखी कोणी होते, याचा तपास सुरू आहे. तसेच ती त्या ठिकाणी कशी पोहोचली, तिच्याशी संबंधित कोणते वाहन परिसरात आढळले का, याचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक पथकांनी तपासणी करत परिसराची झडती घेतली. वैद्यकीय उपकरणे, वैयक्तिक वस्तू पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. तपासाचा भाग म्हणून मृत तरुणीची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीही तपासली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर तपासाची पुढील दिशा निश्चित केली जाईल.
आत्महत्येची शक्यता
या इंटर्न डॉक्टर तरुणींच्या मृतदेहाशेजारी अनेथेसिया इंजेक्शनची सिरिंग्ज सापडल्याने पोलिसांनी प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे