पणजी : राज्यातील शहरी प्रौढांमध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचे प्रमाण 34.8 टक्के झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण 42.2 टक्के, तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 28 टक्के आहे. त्यामुळे वेळीच सतर्क होणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
‘नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया’मध्ये डॉ. प्राजक्ता वाघुर्मेकर, डॉ. ए. एम. फरेरा, डॉ. फ्रेडरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार 57.6 टक्के लोकांना सौम्य, 38.4 टक्के मध्यम, तर 4.1 लोकांना गंभीर आजार असल्याचे समोर आले आहे. अर्थिक वर्गीकरणानुसार पाहिले असता उच्च सामाजिक-आर्थिक वर्गातील व्यक्तींमध्ये ‘फॅटी लिव्हर’चे प्रमाण जास्त आहे. उच्च आर्थिक स्तरात ते 44.4 टक्के तर मध्यम वर्गात हे प्रमाण सर्वात जास्त 48.9 टक्के इतके आहे. तुलनात्मक कमी आर्थिक गटांमध्ये हे प्रमाण कमी आहे. मधुमेह नसलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण 20 टक्के तर मधुमेह असलेल्या लोकांमध्ये त्याचा प्रसार लक्षणीयरीत्या जास्त आहे. जे लोक मांसाहारी आहार घेतात त्यांना शाकाहारी लोकांच्या तुलनेत ‘फॅटी लिव्हर’ होण्याची शक्यता दुप्पट आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये शहरी भागात 278 लोकांपैकी 210 लोकांवर विशेष अभ्यास करण्यात आला. यात 62.9 टक्के महिलांचा समावेश होता. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये ‘फॅटी लिव्हर’चे प्रमाण जास्त होते.
गोव्यात फॅटी लिव्हर ही सार्वजनिक आरोग्याची प्रमुख चिंता बनली आहे. तरुण लोकांमध्येही हा रोग दिसत आहे. मांसाहार करणार्या व्यक्तींमध्ये शाकाहारी लोकांच्या तुलनेत, हे प्रमाण जास्त आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असणार्या व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. आहार आणि विहार यांचे संतुलन आवश्यक असल्याचे मेडिसिन विभागाचे डॉ. ए. एम. फरेरा म्हणाले.