पणजी : जीवन एक सिनेमा बनला आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरेतही याचे दर्शन घडते. शंकराचे तांडव, सरस्वतीचे वीणा आणि कृष्णाचे बासरीवादन हे याचे पुरावे आहेत. आजच्या धकाधकीच्या युगात जीवनाला आनंदाकडे नेणे गरजेचे आहे. यासाठी तरुणाईला वाव देणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात आपल्याकडचा हॅप्पीनेस इंडेक्स (आनंदी निर्देशांक) कमी होत आहे. तो वाढवण्यासाठी अध्यात्माचा स्वीकार महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले.
जगभरातील ‘चंदेरी दुनियेचा महाकुंभ’ मानल्या जाणार्या ‘इफ्फी’चे उद्घाटन आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते कल्पवृक्षाला जल अर्पण करून झाले. गोव्यात पुढील आठ दिवस चालणार्या या महोत्सवाची सुरुवात ऑस्ट्रेलियन चित्रपट ‘बेटर मॅन’ने झाली. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, खासदार सदानंद शेट तानावडे, माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे प्रीतुलकुमार, प्रसार भारतीचे सचिव नवनीतकुमार सैगल, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो उपस्थित होते.
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कल्पवृक्षास जल अर्पण केल्यानंतर भारतातील आध्यात्मिक परंपरेचा उद्घोष करणारा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रादेशिक चित्रपटांचे व्यासपीठ असणार्या इंडियन पॅनोरमाची माहिती सादर करण्यात आली. यासाठी भारतातील विविध राज्यांमधून 1 हजार 307 हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. यातून निवडलेल्या चित्रपटांची माहिती देण्यात आली. हा पॅनोरमा विभाग चंद्रप्रकाश दुबे यांच्या आणि वन्यजीव चित्रपट निर्माते नला मुथा यांच्या नेतृत्वाखालील विशेष समितीने निवडल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर ‘सुवर्ण मयूर’साठी होत असलेल्या जागतिक स्पर्धेचे परीक्षक असलेल्या मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या टीमचा मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि महोत्सव संचालक शेखर कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ओटीटीसाठी कार्यरत असलेले जयदीप आलावेत आणि दाक्षिणात्य कलाकार आर शरथकुमार, प्रणिता सुभाष यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यंदा इफ्फीत मोहम्मद रफी, तपन सिन्हा, नागेश्वरराव आणि राजकपूर या दिग्गजांना आदरांजली वाहून त्यांची आठवण करण्यात आली. समारंभात श्री श्री रविशंकर यांच्यावर बनवण्यात येत असलेल्या ‘इंडो श्रीलंकन’ चित्रपटाचा प्रोमो सादर करण्यात आला. त्यानंतर भारतीय चित्रपटांच्या परंपरेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र-गोवा टपाल विभागातर्फे मान्यवरांच्या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले. यावेळी या विभागाचे प्रमुख अमिताभ सिन्हा उपस्थित होते. यावेळी बोलताना रविशंकर म्हणाले, जीवन एक सिनेमा बनला आहे. भारतीय अध्यात्मिक परंपरेतही याचे दर्शन घडते, भगवान शंकराचे तांडव, सरस्वतीचे विणा आणि कृष्णाचे बासरी वादन हे याचे पुरावे आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनाला आनंदाकडे नेणे गरजेचे आहे, यासाठी तरुणाईला वाव देणे गरजेचे आहे.
अलीकडे आपल्याकडचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ (आनंदी निर्देशांक) कमी होत आहे, तो वाढवण्यासाठी अध्यात्माचा स्वीकार महत्त्वाचा आहे. या समारंभात श्री श्री रविशंकर यांच्यावर बनवण्यात येत असलेल्या ‘इंडो श्रीलंकन’ चित्रपटाचा प्रोमो सादर करण्यात आला. यानंतर भारतीय चित्रपटांच्या परंपरेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता अभिषेक बॅनर्जी यांनी केले.