

मडगाव : राज्यात ‘रेंट अ कार’चा वाद अद्याप शमला नसताना ऑनलाईन टॅक्सी व स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांतील संघर्षामुळे गोव्याला सुट्ट्यांसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वादाचा राज्याच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत असतानाच दक्षिण गोव्यातील काही ‘रेंट अ बाईक’ व्यावसायिकांकडून खासगी दुचाकी बेकायदेशीररित्या भाड्याने दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार मडगाव शहरात उघडकीस आला आहे.
मडगाव येथील आके-मालभाट परिसरात परवानगीशिवाय खासगी दुचाकी भाड्याने देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी तीन ॲक्टिव्हा दुचाकी जप्त करून मडगाव शहर पोलिस स्थानक यांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. आके-मालभाट येथील काळ्या-पिवळ्या दुचाकी मालक संघटनेने या बेकायदेशीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा घटना सुरूच राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या टॅक्सी स्थानकावर संशयित दुचाकी पकडण्यात आल्या. पाहणीअंती गोवा पासिंग नोंदणी क्रमांकाच्या तीन खासगी दुचाकी पर्यटकांना भाड्याने देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले की, काळ्या-पिवळ्या नोंदणी क्रमांकाच्या दुचाकींनाच भाडेपट्टीसाठी परवानगी आहे; मात्र या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचा फायदा घेत काही व्यावसायिक खासगी दुचाकी पर्यटकांना देत आहेत. शुक्रवारी संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या महाराष्ट्रातील तिघा पर्यटकांना अडवून चौकशी केली असता त्यांनी या दुचाकी मडगाव पालिकेजवळील एका ‘रेंट अ बाईक’ व्यावसायिकाकडून घेतल्याचे सांगितले.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक दुचाकींचा विमा संपलेला आहे, तर काही दुचाकी १५ वर्षांहून जुना कालावधी पूर्ण केलेल्या आहेत. चालवण्यास अयोग्य अशा दुचाकी सोशल मीडियाद्वारे विक्रीस काढल्या जातात आणि त्या खरेदी करून बेकायदेशीर भाडे व्यवसायासाठी वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या तीन दुचाकींवर अनुक्रमे १० हजार ते १५ हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी ठोठावला असून अद्याप तो भरलेला नाही. दुचाकी विक्री झाल्यानंतरही त्या मूळ मालकांच्या नावावरच नोंदणीकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. मालकी हक्क बदललेला नसल्यास अपघाताच्या वेळी मूळ मालक अडचणीत येऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांनी नमूद केले. दरम्यान, या दुचाकींसाठी प्रतिदिन सुमारे ५०० रुपये भाडे आकारले जात असून २ हजार रुपये डिपॉझिट घेतले जात असल्याची माहिती पर्यटकांनी पोलिसांना दिली आहे.
‘डॉम्निक’च्या नावे दुचाकींची नोंद
चौकशीत या दुचाकी ‘डॉम्निक’ नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या असल्याची माहिती पुढे आली. आवश्यक परवानगी व अधिकृत नोंदणी नसताना खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित दुचाकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून, वाहनमालकाची चौकशी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.