फोंड्यात आओ-जाओ घर तुम्हारा...

महामार्ग, बगल रस्त्याशेजारी बेकायदा व्यवसाय थाटण्याचे प्रकार वाढले
कुर्टी: अंडरपासमध्ये बिनधास्त असा व्यवसाय चालतो
कुर्टी: अंडरपासमध्ये बिनधास्त असा व्यवसाय चालतो
Published on
Updated on
Summary

अपघाताचा गंभीर धोका

रस्ते महामार्ग खात्याला केराची टोपली

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंड्यात सध्या 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी स्थिती असून कुणी विचारणारा नसल्याने जागा मिळेल तेथे व्यवसाय थाटून पैसे कमावण्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. चौपदरी बगल रस्ते तसेच अंडरपासच्या ठिकाणी हे व्यवसाय थाटण्याच्या प्रकारामुळे वाहनचालक थांबत असल्याने गंभीर अपघातांचा धोका संभवत आहे.

मागच्या काळात रस्ते महामार्ग खात्याने असे सर्व व्यवसाय बंद केले होते. मात्र पंधरा दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार सुरु झाला. कुणाच्या आशीर्वादाने आणि कुणाला चिरीमिरी देऊन बिनधास्तपणे हे व्यवसाय थाटले जातात, असा सवाल केला जात आहे.

फोंडा, कुर्टी, ढवळी तसेच बेतोडा रस्त्यावर बेकायदा जागा अडवून भाजी फळे तसेच इतर साहित्याबरोबरच खुर्चा टेबले आदी अवजड वस्तूही बिनधास्तपणे बिगर गोमंतकीय लोक विकत असून परिसर तर ओंगळवाणा होतोच पण या वस्तू खरेदी करण्यासाठी वाहने रस्त्यावरच थांबवली जातात त्यामुळे अपघातांचे सत्रच सुरु आहे.

अपघातानंतरही परिस्थिती जैसे थे

दोन दिवसांपूर्वी कुर्टी येथील बगल रस्त्यावर एक वाहनचालक खरेदी करण्यासाठी अचानक थांबला असता मागून आलेल्या एका दिव्यांगाच्या दुचाकीची जोरदार ठोकर त्या वाहनाला बसली त्यात ती दिव्यांग व्यक्ती जखमी झाली. मात्र रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यावर कोणताच परिणाम झाला नाही. बेकायदेशीरपणे रस्ता तसेच अंडरपासवर सामान ठेवून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून संभाव्य धोका दूर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

फोंडा तसेच इतर भागात बगल रस्ते तसेच अंडरपासवर बिनधास्त सामान ठेवून विक्री करणाऱ्यांना कुणाचा आशीर्वाद आहे ते आधी हुडकून काढायला हवे. असे प्रकार अजिबात खपवून घेता कामा नये.

- विराज सप्रे, सामाजिक कार्यकर्ता, फोंडा

फोंड्यातील बगल रस्ते आणि अंडरपासमध्ये बिगर गोमंतकीय जागा मिळेल तेथे सामान ठेवून बिनधास्तपणे व्यवसाय करतात. हे बंद करण्यासाठी पोलिस कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

- सुभाष नाईक, आरटीआय कार्यकर्ता, फोंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news