

पणजी (पुढारी वृत्तसेवा): आशयघन कथाकथन, वास्तववादी मांडणी आणि साहित्यिक परंपरेमुळे मराठी चित्रपटसृष्टीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या परंपरांचे गौरव करत ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मराठी सिनेमाच्या विविधतेचे दर्शन घडणार आहे.
यंदा इंडियन पॅनोरमासाठी सात मराठी चित्रपटांची निवड झाली असून, एका गाजलेल्या क्लासिक चित्रपटाची पुनर्स्थापित आवृत्ती शताब्दी श्रद्धांजली विभागात दाखवली जाणार आहे. आणखी एक मराठी चित्रपट गाला प्रिमियरमध्ये प्रदर्शित होईल.
महेश लिमये दिग्दर्शित 'आदि अनंत' या चित्रपटात महत्त्वाकांक्षी अभिनेता आणि त्याच्या आजीमधील भावनिक नाते उलगडले आहे. तसेच लघुपट विभागात अमित पाटकर यांचा 'पनिश्मेंट', संतोष दवखर यांचा 'स्काय ट्री (आभाळ-वृक्ष)' आणि निपुण धर्माधिकारी यांचा 'द मूल (चांदोबा)' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे.
अपराधभाव, दुष्काळातील आशा आणि कोड असलेला किशोरवयीन मुलाचा संघर्ष हे त्यांचे विषय आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक गावडे यांचा 'तू आहेस ना' हा चित्रपट गाला प्रिमियरमध्ये दाखवला जाणार आहे.
दुःख, एकटेपणा आणि ओळख यांसारखे मानवी नात्यांचा वेध त्यात घेतला आहे. तसेच चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित 'देवखेल' या मराठी वेबसिरीजची इफ्फीच्या सर्वोत्कृष्ट वेबसिरीज पुरस्कार गटात निवड झाली आहे. नातेसंबंध, त्याग आणि न बोललेल्या भावनांवर हा चित्रपट भाष्य करतो.
सूर्यकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा १९६५ मधील 'साधी माणसं' हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने पुनर्स्थापित केलेल्या आवर्तित दाखवला जाणार आहे. दिवंगत नाना पाटेकर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात येणार असून, त्यांच्या 'दीक्षा' आणि 'नटसम्राट' हा चित्रपट मिरामार समुद्रकिनाऱ्यावर प्रदर्शित केला जाणार आहे.
५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) कन्नड आणि तुळू चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण चित्रपटांचे दर्शन घडणार आहे. समांतर सिनेमापासून कौटुंबिक नाट्य, लोककथा आणि माहितीपटांपर्यंत विविध प्रकारच्या चित्रपटांचा यात समावेश आहे.
ऋषभ शब्दी दिग्दर्शित आणि अभिनेत 'कांतारा : अ लिजेंड - चॅप्टर १' या चित्रपटाची इंडियन पॅनोरमाच्या मेनस्ट्रीम सिनेमा विभागासह आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पी. शेषाद्री दिग्दर्शित 'रूबी-क्यूब'मध्ये सुट्टीसाठी हिल स्टेशनवर एकत्र आलेल्या तीन पिढ्यांमधील नातेसंबंधांची गुंतागुंत उलगडली आहे. डॉ. प्रदीप कैंचनू यांच्या 'द हग ऑफ एम्पिटेनस' या माहितीपटात बँकेने मालमत्ता जप्त केल्यानंतर २० वर्षांहून अधिक काळ न्यायासाठी लढाणाऱ्या चंद्रशेखर यांचा संघर्ष मांडला आहे. 'उलिदिहू संघिपे मात्र' या लघुपटात हरवलेल्या प्रेयसीच्या आठवणीत जगणाऱ्याच्या मंजनूची भावनिक कथा आहे.