

भारत शिंदे
पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) जोरदार सुरुवात झाली आहे. यंदाचा महोत्सव जागतिक सिनेमा, नवे विभाग आणि डिजिटल माध्यमातील वैविध्यामुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘स्टोरीज् विदाउट बॉर्डर्स’ या संकल्पनेखाली ८६ देशांतील १५० हून अधिक चित्रपट या महोत्सवात दाखवले जात आहेत. १३७ देशांतून आलेल्या १,९०० हून अधिक प्रवेशिकांमधून या चित्रपटांची निवड केलेली आहे. 'फादरलँड' हा उद्घाटनाचा, 'आय मॅटर' हा मध्यवर्ती आणि 'वी आर ऑल स्ट्रेंजर्स' हा समारोपाचा चित्रपट आहे.
यंदाच्या महोत्सवात स्पेन सन्माननीय देश, तर रशिया भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे. ब्रिक्स सिनेमा विभागात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका येथील चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय पॅनोरमा विभागात १८ भाषांतील ७६ चित्रपट झळकणार आहेत. नव्या प्रतिभेला वाव देण्यासाठी ५२ महिला चित्रपट निर्मात्या आणि ६२ पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या कलाकृतींवर भर देण्यात आला आहे. ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’च्या सहाव्या पर्वात १३ कलाप्रकारांतील १०० युवा निर्मात्यांना मार्गदर्शन मिळणार असून, १४ मास्टरक्लासेस आणि परिसंवादांचेही आयोजन केले आहे.
ॲनिमेशनचा नवा विभाग
इफ्फीमध्ये ‘ॲनिमेशन’ आणि ‘फिल्म्स अबाउट फिल्म्स’ हे दोन विशेष विभाग सुरू करण्यात आले आहेत. ॲनिमेशन विभागात जपान, फ्रान्स, चीन, सिंगापूर आणि अमेरिकेतील पाच गाजलेले चित्रपट दाखवले जात आहेत. शू झाओ दिग्दर्शित चीनचा 'लाइट पिलर' हा भविष्यातील अंतराळ प्रवास व एकांतावर भाष्य करणारा चित्रपट आहे. सिंगापूरच्या सन शुन यांचा चिनी भाषेतील 'मॅजिक ॲटलास' हा जादुई नकाशा आणि स्मृतींवरील चित्रपट आहे, तर ब्रॅड बर्ड दिग्दर्शित अमेरिकन चित्रपट 'रे गन' ने या विभागाचा समारोप होणार आहे.
ओटीटी वेब सीरिजलाही स्थान
‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी)’ पुरस्कारासाठी पाच मालिकांना नामांकन मिळाले आहे. देवा कट्टा दिग्दर्शित 'मयसभा : द राईज ऑफ द टायटन्स' ही १९७० च्या दशकातील आंध्र प्रदेशच्या राजकारणावर आधारित मालिका आहे. रुचिर अरुण दिग्दर्शित 'मुसाफिर कॅफे' ही चंदर मोहन शर्मा यांचा प्रेम व स्व-शोधाचा प्रवास उलगडणारी मालिका आहे. लोककथा, शिक्षण, उद्योजकता आणि नात्यांतील गुंतागुंत मांडणाऱ्या या नामांकनांमुळे ओटीटी माध्यमाची सशक्तता अधोरेखित झाली आहे. हिमांक गौर द्वारा दिग्दर्शित 'आदर्श बाल विद्यालय' भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावर विनोदी आणि सामाजिक टिप्पणीच्या माध्यमातून भाष्य करते. यांचा समावेश आहे.
जन्मशताब्दी सोहळा
‘इफ्फी २०२६’ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते शक्ती सामंता आणि राज खोसला, अभिनेते उत्तम कुमार, सूर्यकांत मांढरे, प्रेम नझीर आणि राज कुमार, तसेच प्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर आणि रवी यांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे अमूल्य योगदान आणि देशाचा चित्रपट तसेच संगीत वारसा समृद्ध करण्यात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा या महोत्सवात गौरव करण्यात येणार आहे.