

पणजी : आसाममधील आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी धडपडणाऱ्या पारंपरिक हातमाग विणकर समुदायापासून ते अरुणाचल प्रदेशच्या पर्वतांमधील शोकाकुल वडिलांच्या मानसिक प्रवासापर्यंत, ईशान्य भारतातील दोन चित्रपट ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ओळख, जिद्द आणि मानवी भावनांच्या वेगळ्या कथा घेऊन आले आहेत.
'रेड कार्पेट' ही आसामी माहितीपट इंडियन पॅनोरुमा नॉन-फिचर विभागात आहे, तर 'उरुम' हा इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म श्रेणीचा भाग आहे. पत्रकार परिषदेत आवमी बरुआ दिग्दर्शित 'रेड कार्पेट' (आसामी) आणि दुयु ताब्यो दिग्दर्शित 'उरुम' या चित्रपटांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांबद्दल आणि चित्रपट निर्मितीच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
'रेड कार्पेट' हा चित्रपट आसाममधील कार्सी आंगलोंग येथील कार्बी समुदायाच्या पारंपरिक हातमाग विणकामाच्या वारशाचा शोध घेतो, जिथे शतकानुशतके जुनी कला आधुनिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीच्या आव्हानांना तोंड देत आहे. हा माहितीपट डॉकमोकाम गावातील एका पारंपरिक विणकराच्या कान्सच्या रेड कार्पेटपर्यंतच्या प्रवासाचे अनुसरण करतो. हाताने विणालेले कापड सांस्कृतिक ओळख, अभिमान आणि आशेचे प्रतीक कसे बनले, याचा मागोवा यात घेतला आहे. पारंपरिक विणकाम पद्धती जपण्याची गरज यावर भर देताना त्यांनी तरुण पिढीला आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचा अभिमान बाळगण्याचे आणि हा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
दुसरा चित्रपट 'उरुम', दुयु ताब्यो दिग्दर्शित, अरुणाचल प्रदेशातील दुर्गम पर्वतीय समुदायात आपल्या तरुण मुलीच्या दुःखद मृत्यूशी जुळवून घेण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलांच्या कथेतून दुःख, स्मृती आणि स्थानिक श्रद्धांचा शोध घेतो. अपराधीपणा आणि सतावणाऱ्या दृष्टान्तांशी झगडत असताना, हा चित्रपट दडलेल्या सत्य, आघात आणि त्याच्या लोकांच्या जीवनाला आकार देणाऱ्या अदृश्य शक्तींमध्ये त्याच्या शांतीच्या शोधाचा मागोवा घेतो. अरुणाचल प्रदेशातील स्वतंत्र लेखक-दिग्दर्शक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते दुयु ताब्यो, ज्यांचे काम स्थानिक ओळख, स्मृती आणि सामाजिक वास्तव यांचा शोध घेते, त्यांनी अरुणाचल प्रदेशातील झिरो येथे
बालपणी पाहिलेल्या एका घटनेची आठवण करून दिली. त्यात आपल्या मुलीच्या मृत्यूशी झगडणारे वडील होते. ही आठवण अनेक वर्षे त्यांच्यासोबत राहिली आणि अखेरीस ती चित्रपटाचा पाया बनली.
या चित्रपटाद्वारे त्यांनी एखादा विशिष्ट नैतिक संदेश देण्यापेक्षा शोकाकुल वडिलांची मानसिक आणि भावनिक स्थिती शोधण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यो यांनी इफ्फीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इफ्फीमध्ये आपल्या चित्रपटाची निवड ही अरुणाचल प्रदेशच्या उदयोन्मुख चित्रपट उद्योगासाठी एक महत्वपूर्ण मान्यता असल्याचे त्यांनी वर्णन केले.
तरुण पिढीला मुळाशी जोडण्याचा प्रयत्न
स्थानिक कथा, भाषा आणि जीवनशैलींचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व त्यांनी पुढे अधोरेखित केले. असे प्रयत्न तरुण पिढीला त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडप्यास आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळखीच्या समृद्धतेचे कौतुक करण्यास मदत करू शकतात, असे ते म्हणाले.