IFFI 2026 - इफ्फीमध्ये आयआयसीटी-वॅकॉम इंडियामध्ये सामंजस्य करार

१८ विद्यार्थ्यांना ५० टक्के शिष्यवृत्ती; डिसेंबर २०२७ पर्यंत १० सर्जनशील स्पर्धा
IICT Wacom India MoU IFFI 2026
पणजी: करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही देशांचे प्रतिनिधी.
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सर्जनशील तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास क्षेत्रातील भारत-जपान सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) आणि वॅकॉम इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) २०२६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आयआयसीटी ही अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रांतील भारताची राष्ट्रीय उत्कृष्टता संस्था आहे.

या भागीदारीतून भारतीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक साधने आणि उद्योगाच्या गरजांनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयआयसीटीच्या अॅनिमेशन फिल्म डिझाइन, इंटरअॅक्टिव्ह व्हिडिओ गेम डिझाइन अँड डेव्हलपमेंट आणि पोस्ट प्रॉडक्शन अँड व्हीएफएक्स या तीन दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांतील १८ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना निवासासाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

डिसेंबर २०२७ पर्यंत जपानी आणि भारतीय कलाकार व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंगा (चित्रकथा), अॅनिमे (अॅनिमेशन चित्रपट किंवा मालिका) आणि इतर सर्जनशील विषयांवर १० स्पर्धा आयोजित केल्या जातील. वॅकॉमच्या सहकार्याने दर तीन महिन्यांनी मार्गदर्शनपर विशेष वर्गही घेतले जातील.

दोन्ही संस्था डिजिटल चित्रांकन, संकल्पना कला, व्यक्तिरेखा रचना, अॅनिमेशन आणि गेम आर्ट यांचा समावेश असलेले जागतिक विद्यार्थी पोर्टफोलिओ प्रदर्शन विकसित करतील. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार दर्जेदार पोर्टफोलिओ तयार करता येतील. वॅकॉमच्या टॅब्लेटच्या खोक्यांवर आणि पिक्सेल पर्च या निर्मात्यांच्या मंचावर आयआयसीटीचा समावेश करण्याची तरतूदही करारात आहे.

आयआयसीटीचे संस्थापक संचालक डॉ. आशिष कुलकर्णी म्हणाले की, युवा निर्मात्यांना जागतिक संधी आणि व्यासपीठांशी जोडणे आवश्यक आहे. या भागीदारीमुळे जपानचे अॅनिमेशन, मंगा आणि गेमिंगमधील कौशल्य व भारताची कथाकथन परंपरा यांचा संगम घडेल. आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवस्कर यांनी एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रात रोजगारासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.