

पणजी : राज्यात २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा 'फिल्म्स अबाऊट फिल्म्स' या नव्या विभागाचा समावेश करण्यात आला आहे. 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' (सीमा नसलेल्या कथा) या महोत्सवाच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या विभागात चित्रपट निर्मितीमागील कथा, कलाकारांचे जीवन आणि चित्रपटसृष्टीची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडणारे माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
या नव्या विभागात दोन प्रमुख माहितीपटांचा समावेश करण्यात आला आहे. 'द मॅड डॉग ऑफ युरोप' (फ्रान्स, जर्मनी | २०२६ | ८३ मिनिटे | दिग्दर्शक : रुबिका शाह) या माहितीपटातून हॉलीवूड चित्रपटसृष्टीने राजकीय दबाव आणि व्यावसायिक हितसंबंधांमुळे कधीही पडद्यावर न आणलेल्या एका अप्रकाशित पटकथेची कथा उलगडण्यात आली आहे.
हिटलर आणि नाझीवादाच्या उदयाच्या काळातील एका जर्मन-ज्यू कुटुंबावर आधारित ही पटकथा हर्मन जे. मँकेव्हिच यांनी १९३२ मध्ये लिहिली होती. या कथेवर चित्रपटाची निर्मिती का होऊ शकली नाही, त्यामागील कारणे आणि आजच्या काळात या पटकथेचे महत्त्व काय आहे, याचा वेध या माहितीपटात घेण्यात आला आहे.
'व्हिटोरिओ डी सिका - स्टेजिंग लाईफ' (इटली | २०२६ | १०० मिनिटे | दिग्दर्शक : फ्रान्सिस्को झिप्पेल) हा माहितीपट जागतिक चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक व्हिटोरिओ डी सिका यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या सिनेमॅटिक वारशावर प्रकाश टाकतो.
दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज, कुटुंबीयांचे सहकार्य आणि नामवंत दिग्दर्शकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या कलात्मक प्रवासाचा आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाचा वेध या माहितीपटात घेण्यात आला आहे. केवळ पडद्यावर दिसणाऱ्या कथांपुरते मर्यादित न राहता, कॅमेऱ्यामागील व्यक्ती, त्यांचे संघर्ष आणि चित्रपट संस्कृती घडविणारे ऐतिहासिक संदर्भ प्रेक्षकांसमोर आणणे हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे.