IFFI 2026 मध्ये स्पेनच्या 'अकी' चित्रपटाची बाजी; सुवर्ण मयूर पुरस्काराने गौरव

IFFI 2026 | गोव्याला बनवणार चित्रपटनिर्मितीचे जागतिक केंद्र; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा
IFFI 2026
IFFI 2026
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) तियागो गुडेयस दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट 'अकी' सुवर्ण मयूर (प्रमाणपत्र आणि ५१ लाख रुपये) पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. कांतारा-ए लिजेंड चॅप्टर-१ ची विशेष उल्लेख (स्पेशल मेन्शन) अवॉर्डसाठी निवड करण्याबरोबरच याच चित्रपटातील अभिनयासाठी ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रजत मयूर पुरस्काराने (प्रमाणपत्र आणि रोख रुपये ५० लाख) गौरविण्यात आले.

IFFI 2026
Iffi Goa| सप्तरंगी इफ्फीचे पणजी कायमचे माहेरघर

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला केवळ महोत्सवापुरते मर्यादित न ठेवता, तेथे चित्रपटनिर्मिती, सर्जनशीलता आणि 'ऑरेंज इकॉनॉमी'चे (सृजनशील अर्थव्यवस्था) केंद्र उभारणार आहे. 'मेक इन गोवा आणि मेक फॉर द वर्ल्ड'चा नारा दिला. स्थानिक कलाकार, कोकणी चित्रपट निर्मिती आणि तरुणांना जागतिक संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कोकणी चित्रपटांनी इफ्फीसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अधिक प्रमाणात झळकावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा मनोरंजन सोसायटीने नुकतेच एफटीआयआय, आयआयएमसी, वुमन इन फिल्म इंडिया, आयडियाबाज, गोवा कॉलेज ऑफ आर्टस् आणि ईआयएम क्लब यांच्यासोबत सहा सामंजस्य करार केले आहेत. यातून चित्रपट शिक्षण, स्क्रिप्ट डेव्हलपमेंट, क्रिएटिव्ह स्किलिंग, उद्योजकता तसेच पोस्ट-प्रॉडक्शन आणि एआय-आधारित चित्रपट निर्मितीच्या सुविधांना चालना मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर म्हणाले की, गेल्या नऊ दिवसांत गोवा पुन्हा एकदा जागतिक सिनेमाचे मीलनस्थान बनले आहे. आपण वेगवेगळ्या समाजांतून, वेगवेगळ्या इतिहासांतून, वेगवेगळ्या वास्तवांतून आणि वेगवेगळ्या कल्पनाविश्वांतून प्रवास केला आहे. कदाचित सिनेमाचा मूळ उद्देशही हाच आहे.

सिनेमाचा उद्देश नेहमीच उत्तरे देणे हा नसतो. कधी-कधी त्याने प्रश्न उपस्थित करायचे असतात. कधी-कधी त्याने समाजासमोर आरसा धरायचा असतो. कधी-कधी ज्यांचा आवाज ऐकला गेलेला नाही, त्यांना आवाज द्यायचा असतो, असे त्यांनी नमूद केले.

इफ्फीचा सांगता सोहळा शनिवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचलकुमार, महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या.

कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते चित्रपट निर्माता-दिग्दर्शक म्हणून तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ठरलेल्या आदित्य सुहास जांभळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा उल्लेखनीय सर्जनशील प्रवास, चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि भारतीय सिनेमाच्या बदलत्या परिप्रेक्ष्यात त्यांनी दिलेले योगदान यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.

हिंदी माहितीपट-नाट्य मालिका 'मेड इन इंडिया : ए टायटन स्टोरी' या वेब सीरिजला २०२६ ची 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी)' पुरस्कार प्रदान करण्यात आला. रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित, प्रभलीन सिंधू यांची संकल्पना आणि ऑलमायटी मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या मालिकेने, परीक्षक मंडळाने निवड केलेल्या, विविध पाच भारतीय भाषांतील मालिकांना मागे टाकत बाजी मारली.

IFFI 2026
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

महोत्सवाची भव्य व्याप्ती

यंदाच्या महोत्सवात सुमारे १७ हजार प्रतिनिधी नोंदणी, १६१ चित्रपट, १४ ठिकाणी ३७४ शो आणि ९० देशांतील सहभाग नोंदवला गेला. मास्टरक्लास, पॅनेल चर्चा, संभाषणे आणि गोलमेज परिषदांसह १७ सत्रे आयोजित करण्यात आली. महोत्सवाच्या 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' या संकल्पनेअंतर्गत दिव्यांगांनाही सिनेमाचा अनुभव घेता यावा यासाठी 'स्वयं' सोबत भागीदारी करून सर्वसमावेशकतेवर भर देण्यात आला.

स्पेनचा 'कंट्री ऑफ ऑनर' तर रशियाचा 'पार्टनर कंट्री' म्हणून सहभाग होता. हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, स्थानिक व्यवसाय आणि सेवा पुरवठादारांमुळे महोत्सवाची ऊर्जा पणजीत जाणवली असून, रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासासाठी चित्रपट व मनोरंजन क्षेत्र महत्त्वाचे आहे. आगामी काळात चित्रपट क्षेत्रात महिला व तरुणांचा अधिक सहभाग असावा, अशी इच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नासाठी नवेपणा, तंत्रज्ञान, संशोधन, डिजिटलायझेशन आणि सर्जनशीलतेच्या बळावर पुढे जाण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.