Anesthesia Film | स्वतःच्या चुकीची शिक्षा की मनाचा संघर्ष? 'अनेस्थेशिया' चित्रपटातून मांडला मानवी भावनांचा गुंता

Anesthesia Film | डॉक्टरच्या आयुष्यातील दुर्दैवी घटना आणि मानसिक संघर्ष; इफ्फीतील 'अनेस्थेशिया' चित्रपटाची कथा
Anesthesia Film
Anesthesia Film
Published on: 
Updated on: 

पणजी : दीपक जाधव

जारो वोजटेक दिग्दर्शित 'अनेस्थेशिया' हा मानवी मनातील अपराधीपणा, आत्मसंघर्ष, श्रद्धा आणि नैतिक जबाबदारी यांचा वेध घेणारा अंतर्मुख चित्रपट आहे. इफ्फी २०२६ मधील 'सिनेमा ऑफ द वर्ल्ड' विभागात प्रदर्शित झालेल्या या स्लोव्हाकियन चित्रपटातून एका डॉक्टरच्या आयुष्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा आणि त्यानंतर सुरू झालेल्या मानसिक प्रवासाचा शोध घेतला आहे.

Anesthesia Film
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

चित्रपटाचा केंद्रबिंदू डेव्हिड हा भूलतज्ज्ञ डॉक्टर आहे. शस्त्रक्रियेदरम्यान एका लहान मुलाचा मृत्यू होतो. या घटनेमागे डेव्हिडचा थकवा आणि एकाग्रतेचा अभाव कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घटनेनंतर त्याच्या मनात निर्माण झालेली अपराधी भावना त्याला अस्वस्थ करते. स्वतःच्या चुकीची जाणीव आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण यांपासून दूर जाण्यासाठी तो एका दुर्गम गावात आश्रय घेतो.

हे गाव धार्मिक यात्रास्थळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, बाह्य जगापासून दूर गेल्यानंतरही त्याला स्वतःच्या अंतर्मनापासून पळता येत नाही. उलट, स्वतःच्या विवेकाशी आणि श्रद्धेशी त्याचा संघर्ष अधिक तीव्र होतो.

दिग्दर्शक जारो वोजटेक यांची मांडणी या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. केवळ एका व्यक्तीच्या वैयक्तिक दुःखाची कहाणी सांगण्याऐवजी ते मानवी जीवनातील नैतिक प्रश्नांना व्यापक स्वरूप देतात. एखादी चूक घडल्यानंतर तिची जबाबदारी स्वीकारणे, स्वतःला माफ करणे आणि पुन्हा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणे किती कठीण असते, याचा चित्रपट विचार करायला लावतो.

पटकथालेखनात मार्क लेशकाक आणि जारो वोजटेक यांचा सहभाग आहे. त्यामुळे कथेला सामाजिक आणि आध्यात्मिक संदर्भांची जोड मिळते. छायाचित्रणाच्या दृष्टीने चित्रपटातील ग्रामीण परिसर, डोंगररांगा आणि गावातील शांत वातावरण यांना विशेष महत्त्व आहे.

Anesthesia Film
Iffi Goa| सप्तरंगी इफ्फीचे पणजी कायमचे माहेरघर

छायाचित्रकार तोमाश स्टानेक यांनी नैसर्गिक प्रकाशाचा प्रामुख्याने वापर करून वास्तववादी दृश्यभाषा निर्माण केली आहे. कृत्रिम प्रकाशाचा वापर अत्यंत मर्यादित ठेवण्यामागेही वास्तवाचा अनुभव अधिक प्रभावी करण्याचा हेतू दिसतो. निसर्गातील शांतता आणि नायकाच्या मनातील अस्वस्थता यांमधील विरोधाभास दृश्यांना वेगळा अर्थ प्राप्त करून देतो. मिलान मिकुलचिक याने डेव्हिडची भूमिका साकारली आहे.

या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अपराधीपणा, मानसिक द्वंद्व आणि श्रद्धेविषयी निर्माण झालेले प्रश्न पडद्यावर येतात. गावातील इतर व्यक्तिरेखा कथेला केवळ गंभीरतेपुरते मर्यादित ठेवत नाहीत. त्यांच्या दैनंदिन जीवनातील विनोद, उपरोध आणि साधेपणा यांमुळे चित्रपटाला मानवी स्पर्श मिळतो. त्यामुळे गंभीर विषय असूनही चित्रपट एकसुरी होत नाही.

श्रद्धा, क्षमा, जबाबदारी आणि माणुसकीचे संबंध

'अनेस्थेशिया' हा वेगवान मनोरंजनापेक्षा प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. श्रद्धा, क्षमा, जबाबदारी आणि माणुसकी यांचे परस्परसंबंध तपासणारी ही कलाकृती जागतिक चित्रपटांच्या आशयसमृद्ध परंपरेतील एक महत्त्वाची भर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.