

पणजी : ‘इफ्फी’निमित्त आयोजित फिल्म बाजार हा केवळ औपचारिक सोहळा नाही. हा बाजार म्हणजे नवीन कथाकारांना सक्षम बनविणारा मंच आहे. भारताला चित्रपटनिर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून भारतीय चित्रपटसृष्टीची वाटचाल सुरू आहे. यावर्षी बाजारात 7 देशांतील चित्रपटांचा समावेश असून, 124 नवीन निर्मात्यांच्या सहभागाची नोंद झाली आहे. त्यातून भारतीय संस्कृती आणि आशय जगासमोर आणण्यात फिल्म बाजार महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केले. दरम्यान, हा बाजार 24 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
दक्षिण आशियातील जागतिक चित्रपट बाजारपेठ, वेव्हज् फिल्म बाजारचे उद्घाटन पणजीतील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री मुरुगन बोलत होते. यावेळी ‘इफ्फी’ महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, अभिनेता नंदमुरी बालकृष्ण, अनुपम खेर, वेव्हज् बाजारचे सल्लागार जेरोम पैलार्ड, ऑस्ट्रेलियन चित्रपट संचालक गार्थ डेव्हिस आणि ‘एनएफडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. अतिरिक्त सचिव प्रभात यांनी आभार मानले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले, फिल्म बाजार म्हणजे स्क्रीनिंग, मास्टर क्लासेस आणि तंत्रज्ञान प्रदर्शनांची संपूर्ण परिसंस्था आहे. वेव्हज्ची नवीन ओळख तयार करताना पंतप्रधानांच्या कलांचे व्यापारात रूपांतर ही थीम वापरण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी जगातील पहिले ई-मार्केटप्लेस खुले झाले आहे. वेव्हज्च्या माध्यमातून निर्माते आणि देशांना जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.