

पणजी : जन्म प्रमाणपत्रावर मुलीला आईचे आडनाव देण्याचा अधिकार आईला आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. आईचे आडनाव नोंदवल्याने जैविक वडिलांचे कायदेशीर हक्क वारसा, उत्तराधिकार व पालनपोषण यावर कोणताही परिणाम होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांनी ९ वर्षांच्या मुली व तिच्या आईला दिलेल्या दिलाश्यात सांगितले की, नावातील बदल हा केवळ संगोपनाच्या वास्तव परिस्थितीचे प्रतिबिंब आहे; त्यातून वडील-मुलीतील जैविक व कायदेशीर नाते अबाधित राहते.
प्रकरणात बंगळूरूमधील दोन नेपाळी नागरिकांच्या लिव्ह - इन नात्यातून २०१७ मध्ये मुलीचा जन्म झाला. नंतर वडील नेपाळला परतले. आईने जन्म प्रमाणपत्रावरून वडिलांचे नाव काढून स्वतःचे आडनाव देण्याची मागणी बंगळूरू महानगर पालिकाकडे केली होती.